
वाळुज महानगर, (ता 19) – छत्रपती संभाजीनगर येथील फार्मा कंपन्यांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘फार्मा क्रिकेट लीग सिझन 2 स्पर्धेत’ रविवारी 16 नोव्हेंबर रोजी चुरशीच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्ये वाळुज येथील इप्का लॅबोरेटरीज कंपनीने उत्कृष्ट खेळ करत, वारीन संघावर 8 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

एसआरपी (SRP) ग्राउंड सातारा परिसर येथे रविवारी 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत इप्का, हारमन एपीआय, हारमन फॉर्म्युलेशन, ग्लेनमार्क, लुपिन, एफ.डी.सी, क्युरिया, वारीन अशा एकूण 8 नामांकित फार्मा कंपन्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपले क्रिकेटींग कौशल्य दाखवले. दिवसभर चाललेल्या चुरशीच्या सामन्यानंतर, स्पर्धेचा अंतिम सामना इप्का लॅबोरेटरीज आणि वारीन या बलाढ्य टीम्समध्ये खेळवण्यात आला. हा अंतिम सामना अत्यंत रोमांचक झाला. दोन्ही टीम्सनी 8-8 षटकांत प्रत्येकी 95 धावा केल्या. आणि सामना बरोबरीचा (Tie) झाला. उपस्थित प्रेक्षकांच्या श्वास रोखणाऱ्या क्षणांनंतर, विजेत्याचा निर्णय घेण्यासाठी सुपरओव्हर (Super Over) खेळवण्यात आली. या सुपर ओव्हरमध्ये इप्का लॅबोरेटरीज कंपनीने उत्कृष्ट खेळ करत, वारीन संघावर 8 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आणि फार्माकपचे विजेतेपद पटकावले.
या विजयानंतर इप्का लॅबोरेटरीजचे युनिट हेड संजय चौबे म्हणाले की, “खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, एकजूट आणि जिंकण्याची भूक पाहून आम्हाला अभिमान वाटतो. खेळाडूंची कामगिरी हीच विजयाची गुरुकिल्ली ठरली.” तसेच इप्का लॅबोरेटरीजचे मानव संसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी सांगितले की, “हा विजय केवळ एका संघाचा नसून, संपूर्ण इप्का कुटुंबाचा आहे. कर्मचारी क्रीडा उपक्रमांद्वारे ऊर्जा आणि नवे बंध निर्माण करतात, ज्यामुळे कामासोबतच क्रीडा संस्कृतीलाही प्रोत्साहन मिळते.” या शानदार विजयात गिरिधर गायकवाड, अमर बोराटे आणि प्रफुल्ल कांबळे यांनी खेळाडूंचा उत्साह वाढवून त्यांना प्रोत्साहन दिले.
