
वाळुज महानगर, (ता.7) – बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे विद्युत मीटर घेऊन विश्वासाने फसवणूक केली. तसेच प्लॉट हडपण्याच्या उद्देशाने तो सोडण्यास नकार देत असल्याने प्लॉट धारकाने दोघांविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकारामुळे वाळूज परिसरातील प्लॉट धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एन-3, छत्रपती संभाजीनगर येथील व्यापारी शैलेश मधुसुदन टिबडेवाल, (वय 44) यांच्या नावावर असलेला राजदिप सहकारी गृह निर्माण संस्था, गट नंबर 51, साजापूर मधील 900 स्के. फुटचा प्लॉट हडप करण्याच्या उद्देशाने आरोपी मोहम्मद रफीक अब्दुल राजीक याने खोटे खरेदीखत तयार करून बनावट प्लॉटचे नमूना 8 उतारा तयार करून त्याचा उपयोग एम एस ई बी येथे करून स्वतःच्या नावावर विद्युत मिटर घेतले. व विश्वासघात करून फसवणूक केली. त्यानंतर त्यास वेळोवेळी प्लॉट सोडणेबाबत विनंती केली असता तो प्लॉट सोडत नाही. याबाबत त्याला 1 जुलै 2018 ते 28 मार्च 2024 पर्यंत समजवित असल्याने व तो प्लॉट सोडत नसल्याने टिबडेवाल यांनी आरोपी मोहम्मद रफीक अब्दुल राजीक व त्याला बनावट व खोटे कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या इसमांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शैलेश मधुसूदन टिबडेवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडिसी पोलीस ठाण्यात कलम 420, 406, 468, 471 भादविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करीत आहे.
प्लॉट धारकांमध्ये खळबळ –
वाळूज औद्योगिक वसाहतीत तसेच परिसरात अनेकांचे प्लॉट आहेत. त्यातील बहुतांश प्लॉट हे मोकळे आहेत या प्लॉटवर काही भूमाफिया अतिक्रमण व बनावट कागदपत्रे तयार करून कब्जा करत आहेत. पै पै जमा करून खरेदी केलेले प्लॉट हडप होत असल्याने वाळूज परिसरात प्लॉट धारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
