
वाळूजमहानगर, (ता.31) – रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे, महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षा रत्न पुरस्कार 2023 बजाजनगर येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा उपप्राचार्य डॉ संजय सांभाळकर यांना जाहीर झाला आहे.
डॉ सांभाळकर यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ सांभाळकर यांनी 40 रिसर्च पेपर, पाच संदर्भ ग्रंथांचे लेखन केलेले आहे. विद्यापीठाच्या व महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक समितीवर त्यांनी कार्य केलेले आहे. तसेच विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी कल्याण संचालक, शाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक आदी पदावर त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांच्या या संघटनात्मक, संशोधनात्मक, प्रशासकीय व शैक्षणिक कार्याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. 4 जून 2023 रोजी हा पुरस्कार त्यांना जळगाव येथील राष्ट्रीय परिषदेमध्ये देण्यात येणार आहे. त्याबद्दल डॉ सांभाळकर यांचे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे.
