
वाळुज महानगर (ता.30) – एका आयशर टेम्पो मध्ये लहान मोठी 14 जनावरे कोंबून यांची अत्यंत निर्दयीपणे वाहतूक केल्या जात असल्याचा प्रकार गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 14 लाख रुपये किमतीच्या या जनावरांची सुटका केली. कारवाई सोमवारी 29 डिसेंबर रोजी वाळूज परिसरात करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डायल 112 वर कॉल आला की, वाळूज परिसरातील तिसगाव पुल ए.एस. क्लब शेजारी एक वाहन गो रक्षकांनी पकडले असून त्यात जनावरे आहेत. ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची त्यांना शंका आहे. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांनी फौजफाट्यासह सोमवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तेथे गो रक्षक नयना राजपूत उपस्थित होत्या. त्यांनीच पोलिसांना फोन केल्याचे सांगितले. गो रक्षक नयना राजपूत यांनी पकडलेल्या आयशर (एम एच 38 एक्स- 3441) या वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये 14 लाख रुपये किमतीच्या 10 म्हशी व 4 लहाने पिल्ले (वगारू) असे निर्दयीपणे डांबुन, कोंडुन त्यांची क्रूरतेने वाहतुक करताना दिसले.
पोउपनि पाथरकर यांनी वाहन चालक व्यंकटी सखाराम मोरे (वय 62 वर्षे) रा. बोराळा ता. वसमत जि. हिंगोली याला जनावरांबाबत विचारपुस केली असता त्याने मुनव्वर सिंकदर शेख रा. शहाबाजार, सिटी चौक, ता.जि. छत्रपती संभाजीनगर यांचेकडे घेवुन जात असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलिस अंमलदार सुहास रामधन मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी व्यंकटी सखाराम मोरे व मुनव्वर सिंकदर शेख यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनिमय 1960 कलम 11 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
