वाळूजमहानगर (ता.17) :- मनाची प्रसन्नता असल्याशिवाय प्रसादाची गोडी चाखता येत नाही, आणि जीवब्रम्हैक्यरूपी प्रसाद प्राप्ती हीच परमार्थातील परिपूर्णता होय, म्हणून महाप्रसादाने सप्ताह साधनेची सांगता होत असते. असे सुंदर विचार ताईंकडून श्रवण करायला मिळाले.
चला वळू गायी। बैसू जेवू एके ठायी।। बहु केली वणवण। पायपीटी झाला शीण।।
या अभंगावर आखिल भारतीय वारकरी मंडळ, महिला कमिटीच्या राज्य प्रमुख असलेल्या भागवताचार्या हभप सौ मनिषाताई बिडाईत पाटील यांनी रामनगर, संभाजीनगर येथील महिला सप्ताहची सांगता प्रसंगी निरूपण केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मराठवाडा वारकरी मंडळअध्यक्ष हभप केशव आण्णा चावरे यांची उपस्थितीसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांसह भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली. वै हभप बाबूराव वाघ गुरूजी यांच्या प्रेरणेने चालत आलेला रामनगर येथील महिला सप्ताहची सांगता हभप सौ मनिषाताई बिडाईत यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली. या सप्ताहाच्या यशस्वितेसाठी वै हभप बाबूराव वाघ गुरूजी यांचे चिरंजीव अँड. उद्धव वाघ, त्यांचे सहकारी, रूक्मिणी महिला भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था, हनुमान भजनी मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.