March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.21) – सिडको वाळूज महानगर येथील एलआयजी व एमआयजी परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी सिडको प्रशासनाकडे वारंवार लेखी निवेदने देऊन तसेच अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठका घेऊन सुध्दा प्रशासनाने कुठल्याही समस्या सोडविल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने सिडको प्रशासनाविरुद्ध विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (ता.21) रोजी सिडको कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे.

 

या आमरण उपोषणाची सुरुवात उप जिल्हाप्रमुख बप्पा दळवी व शिवसेना उपतालुकाप्रमुख तिसगावचे माजी उपसरपंच विष्णू जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवराय, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी सिडको प्रशासनाविरुद्ध शेकडो नागरिकांनी व शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सिडकोच्या वतीने सर्वसामान्यांना अल्प दरात घरे उपलब्ध व्हावी. याकरिता सिडको वाळूज महानगर अंतर्गत एलआयजी व एमआयजी गृह प्रकल्प 30-35 वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आला. आज या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्यास आहे. 35 वर्षांपूर्वी परिसराच्या लोकसंख्येच्या विचार करून सिडको प्रशासनाने ड्रेनेज लाईन, पाणी, विद्युत पुरवठा रस्ते या मूलभूत सुविधा पुरविल्या होत्या. मात्र आता परिसराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. येथील अनेक समस्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीने विभागप्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी अनेकदा सिडको प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले. मात्र सुस्त प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासन विरुद्ध शिवसेना आक्रमक झाली आहे. याचाच एक भाग म्हणून लोकशाही मार्गाने आज मंगळवारी (ता.21) रोजी सिडको प्रशासनाविरुद्ध विभाग प्रमुख दत्तात्रय वर्पे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपासले आहे. त्यांच्या या आमरण उपोषणाच्या आंदोलनाला करण साळे, ज्ञानेश्वर गोल्हार, अक्षय केरे, नामदेव सागडे, जनार्दन चील्लारे, भरत फुलारे, अनिता डहारीया, छाया जाधव, सुनंदा कुदळे, महावीर धुमाळे, विजय कुबेर, सिद्धार्थ नरसाळे, यशवंत चौधरी, भागवत चौधरी, काशिनाथ गोलांडे, दत्तात्रय निसळ, राकेश सक्सेना, उत्तम ठोकळ, त्र्यंबक जगताप, शंकर गावंडे, रुपेश कुदळे, भानुदास पळसकर, सत्यनारायण गगड, नितीन कळात्रे, किशोर गाडे, महेश पाटील यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.

काय आहे वर्पे यांच्या मागण्या
त्यामुळे प्रशासनाने पूर्वीची जुनाट झालेले ड्रेनेज लाईन व पाण्याची पाईपलाईन बदलून लोकसंख्येच्या प्रमाणात मोठ्या साईज मध्ये तात्काळ नवीन ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा करणारे पाईपलाईनचे काम हाती घ्यावे. अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करून डांबरीकरण किंवा काँक्रीटकरण करावे. मुख्य रस्त्यावरील पददिवे बदलून त्याऐवजी एलईडी दिवे बसवावे. मुख्य चौक, खेळाची मैदान व उद्यानात हायमास्ट लॅम्प बसवावे. परिसरात आरोग्य केंद्र, पोलीस चौकी, समाज मंदिर, अंगणवाडी, भाजी मंडई, बसस्टॉप या सर्व इमारतीचे नूतनीकरण व सुशोभीकरण करावे. बंद असलेल्या इमारती वापरात आणाव्या. घरासमोर लोंबवणाऱ्या धोकादायक विद्युत तारा काढून भूमिगत विद्युत पुरवठा सुरू करावा. उद्यानांचे सुशोभीकरण करावे. पाणीपुरवठा योग्य दाबाने व नियमित सुरू करावा. हरित पट्ट्यामध्ये वृक्षरोपण करून सुशोभीकरण करावे. सिडकोने अधिकृत केलेल्या खाजगी जमिनीवर म्हणजेच गट नंबर मधील संपूर्ण वसाहतीला नियमित करून सिडको अंतर्गत सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *