वाळूजमहानगर – पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पैठण येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी उपस्थित राहण्याचे पत्र काढून आदेश देणाऱ्या प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करा. अशी मागणी औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष सय्यद अलीम पापा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांना दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, एकात्मिक बालविकास सेवा योजना औरंगाबाद 2 या कार्यालयातील पर्यवेक्षिका व 42 गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पैठण येथे होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी उपस्थित राहण्याचे प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी एम ए पाटील यांनी स्वतःच्या सहीने पत्र काढून आदेश बजावले आहेत. त्यांना कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचना नसताना तसेच कोणत्याही राजकीय पक्षाने सांगितले नसताना केवळ गटातटातील वातावरण खराब करून सामाजिक शांतता भंग करण्याचे काम संबंधित अधिकारी यांनी पदाचा गैरवापर करून केले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. महाराष्ट्र राज्याचे विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित दादा पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी हे कृत्य केले असून त्यांच्या सहीचे व 8 सप्टेंबर रोजीचे हे पत्र प्रसार माध्यमात प्रसिद्ध झालेले आहे. स्वतःची प्रतिमा वाढवण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी एम ए पाटील यांनी हे पत्र पदाचा गैरवापर करून काढले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करून इतर तालुक्यात बदली करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही या निवेदनाव्दारे औरंगाबाद जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष सय्यद अलीम पापा यांनी दिला आहे. दरम्यान पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.