March 23, 2026


वाळुज महानगर, (ता. 22) – ‘सुसंवाद-जागर भक्तीचा’ या उपक्रमा अंतर्गत गंगापूर तालुक्यातील अनेक संत एकत्रित येऊन प्रत्येक एकादशीला सकाळी गाव खेड्यात जाऊन नगरप्रदक्षिणा व गावकऱ्यांना कुटुंब प्रबोधन, मातृशक्तीचा जागर, व्यसनमुक्ती, समरसता, बाल संस्कार, गोसेवा, सण-उत्सव, विविध महापुरुषांची जयंती, ग्राम स्वच्छता. अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करत आहे. हा अनोखा व धार्मिक उपक्रम गंगापूर तालुक्यात राबविण्यात येत आहे.

याच उपक्रमांतर्गत पाचव्या व भागवत एकादशीनिमित्त रविवारी (ता.22 जून) रोजी तुर्काबाद (खराडी) परिसरातील दहेगाव जवळील सारंगपूर येथे अनेक संत व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुसंवाद जागर भक्तीचा हा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी सारंगपूर येथील महिलांनी नगर प्रदक्षिणा मार्गावर सडा टाकून आकर्षक रांगोळ्या घातल्या होत्या. विशेष म्हणजे या नगर प्रदक्षिणेतील धार्मिक ग्रंथ व विणेकर्‍यांची गल्लीतील महिलांनी ठीक ठिकाणी स्वागत केले. शेवटी गावातील हनुमान मंदिरात या अभियानात सहभागी झालेल्या संत, महंत, ह भ प महाराज, भागवताचार्य, रामायणाचार्य यांनी विविध अभंगाद्वारे समाज प्रबोधन केले. यावेळी महिला, पुरुष व तरुण यांच्यासह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपक्रमाला प्रत्येक गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अनेक गावांची आपल्या गावात या उपक्रमाची मागणी होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *