March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.6) – आषाढी एकादशीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘प्रति पंढरपूर’ येथे रविवारी 6 जुलै रोजी लाखो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी केली.

विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने परिसर भक्तीमय झाला होता. विविध भागांतून आलेल्या वारकऱ्यांनी येथे एकत्र येत हरिनामाचा गजर करत विठ्ठलाचा जयघोष केला.

आषाढी एकादशीनिमित्त वाळुज परिसरातील प्रति पंढरपूरमध्ये रविवारी तास 6 जुलै रोजी सकाळपासूनच भाविकांची रीघ लागली होती.

टाळ, मृदंग, अभंग आणि विठ्ठलनामाच्या ओव्या म्हणत वारकरी दिंड्यांच्या रूपात या पवित्र स्थळी दाखल झाले. महिला, पुरुष, वृद्ध, लहानग्यांपासून ते युवकांपर्यंत सर्वच भक्तांनी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी गर्दी केली होती.

मंदिर समिती व पोलीस प्रशासनाच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते.

वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. राज्य राखीव पोलीस दलासह जिल्हा पोलीस दल, होमगार्ड्स यांची नेमणूक करण्यात आली होती.

भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय यंत्रणाही सज्ज होती. आपत्कालीन सेवा, अॅम्ब्युलन्स, प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर व नर्सेस यांची विशेष व्यवस्था केली होती. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सतर्क ठेवण्यात आली होती.

विठ्ठल भक्तीचा महासागर –
प्रति पंढरपूरमध्ये फुलांच्या सजावट, रंगीत झगमगाट आणि वारकऱ्यांच्या नादाने एक अद्वितीय वातावरण तयार झाले होते. “पुंडलीक वरदा हरि विठ्ठल” च्या गजरात हा भक्तीचा महापर्व मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात पार पडला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *