वाळूजमहानगर, (ता.11) – पोहण्यासाठी गेलेल्या 12 ते 14 वयोगटातील चार मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही हृदय द्रावक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडलेली ही घटना गुरुवारी (ता.11) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगरात राहणारे बिश्वजीतकुमार सुखदेव उपाध्यय (12), अबरार जावेद शेख (12), अफरोज जावेद शेख (14) कुणाल दळवी (13 वर्ष) असे असे चार जण गुरुवारी (ता.11) रोजी दुपारी रांजणगाव (शेणपुंजी) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते.
मात्र बराच वेळ झाला तरी मुले घरी आली नसल्याने पालकाने परिसरात विचारपूस केली. ही सर्व मुले पाझर तलावाकडे गेली असल्याची माहिती मिळाल्याने पालकांनी तेथे जाऊन पाहिले असता तलावाच्या काठावर कपडे व मोबाईल दिसून आले. ते पालकांनी ओळखल्याने मुले बुडाल्याची खात्री झाली.
दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे पी के चौधरी, के टी सूर्यवंशी, एन एस कुमावत, पी के हजारे, एस बी महाले, वाय डी काळे, एस बी शेंडगे आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने सर्व मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक डाके, पोलीस अंमलदार योगेश शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेत पाण्यातून काढलेले सर्व मृतदेह रांजणगाव ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयात रवाना करण्यात आले. 
उद्योजकासह नागरिक धावले मदतीला –
रांजणगाव येशील येथील तलावात चार मुले बुडाले ही माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने रांजणगाव (शेणपुंजी) येथील उद्योजक प्रभाकर महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तू हिवाळे, जावेद शेख, साईनाथ जाधव व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून आणण्यास मदत केली. 
प्रत्यक्ष पाण्यात उतरून पाहणी –
या हृदय द्रावक घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांनी प्रत्यक्ष दलदल युक्त पाण्यात उतरून घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान गंगापूरचे तहसीलदार सतीश सोनी यांनी भेट देऊन माहिती घेतली.
सख्ख्या भावाचा मृतात समावेश –
तलावाच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या चार जणांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. अबरार जावेद शेख (12) व अफरोज जावेद शेख (14) ची या दोन्ही सख्ख्या भावांची नावे आहेत. 
फक्त दोघेच भाऊ –
रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगर येथे राहणारे जावेद शेख हे लेबर ठेकेदार आहेत. त्यांना अबरार शेख व अफरोज शेख अशी दोनच मुले होती. बहिण नसलेल्या या दोन्ही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
