
वाळूज महानगर, (ता.1) – मुलाच्या ताब्यावरून पती पत्नीचे भांडण पोलीस ठाण्यात आले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाल्याने आणखी त्यांचे पाच नातेवाईक धावून आले. आणि त्यांनी आपापसात झोंबाझोंबी करत एकमेकांना मारहाण करून पोलीस ठाण्याची शांतता भंग केली. हा प्रकार चक्क पोलिसांसमोरच वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:15 वाजेच्या सुमारास घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस हवालदार तुकाराम काशीनाथ पवार हे ठाणे अंमलदार म्हणून काम करत असताना गुरुवारी 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5:15 वाजेच्या सुमारास कुलदिपसिंग उमरावसिंग पाटील (वय 32 वर्ष) रा न्यु श्रीरामनगर रांजणगाव (शे पु) व मोनिका कुलदिपसिंग पाटील (वय 33 वर्ष) रा. सिडको महानगर-1 प्लॉट नं 4 गुरुसिध्दी टॉवर हे पोलीस ठाण्यात आले. यांचा मुलाच्या ताब्याबाबत वाद होता. तक्रार देत असतानाच त्यांचा पुन्हा वाद झाल्याने त्यांचे नातेवाईक निखीलसिंग उमरावसिंग पाटील, उमरावसिंग अभिमन पाटील, मिना उमरावसिंग पाटील, शितल उमरावसिंग पाटील, उपासना समिर देशमुख यांनी ठाणे अंमलदाराच्या केबिनमध्ये येऊन पोलिसांसमोरच झोंबाझोंबी करत एकमेकांना हाताचापटाने मारहान केली. त्यामुळे पोलीस ठाण्याची शांतता भंग झाली. यावेळी पोलीस ठाण्यात अचानक गोंधळ झाल्याने पोलीस उपनिरीक्षक विनोद आबुज, पोलीस हवालदार तुकाराम पवार, नावीद खान, राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, जयश्री म्हस्के, जयश्री फुके, पोलीस अंमलदार अदिनाथ जाधव, जालिंदर वाखुरे, लखनसिंग गुसिंगे, प्रतिभा तांबटवाड आदींनी धाव घेत त्यांचे भांडण सोडवले. याप्रकरणी पोलीस हवालदार तुकाराम पवार यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
