
वाळूजमहानगर (ता.13) – अपघाताच्या घटना टाळण्यासाठी कारवाईचा बडगा उगाळून सुद्धा अनेक वाहनधारक नियम पाळत नाही. त्यामुळे वाळुज एमआयडीसी पोलिसांनी गांधीगिरीचा उपक्रम अवलंबत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना गुलाब पुष्प दिले. तसेच नियमांचे व्यवस्थित पालन करणाऱ्यांनासुद्धा गुलाब पुष्प देऊन त्यांचे सोमवारी (ता.13) रोजी स्वागत करण्यात आले.
वाढत्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी नियमाचा बडगा उगारत पोलिसांच्या वतीने अनेक वेळा कारवाई करण्यात आली. मात्र तरीही अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करत नाही. परिणामी अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून अनेकांना आपले जीव गमवावे लागत आहे. सध्या दिवाळी सण, उत्सवाचे दिवस आहे. त्यामुळे वाहनधारकांची मोठ्या संख्येने रस्त्यावर वर्दळ आहे. अशावेळी अपघात होऊन एखादी व्यक्ती मयत झाली तर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. सणासुदीत असा प्रकार होऊ नये, आणि वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमाची सवय लागावी.
यासाठी वाळुज एमायडिसी पोलीस ठाणेयाच्या वतीने सोमवारी (ता.13) रोजी वाळुज औद्योगिक परिसरातील कामगार चौक, एनआरबी चौक, सिएट चौक, रांजणगाव (शेणपुंजी) येथील दत्तनगर फाटा, बजाजनगरयेथील महाराणा प्रताप चौक, रमेश मोरे चौक, पंढरपूर येथील तिरंगा चौक अशा विविध चौकात गांधीगिरी करत विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन वाहतुकीच्या नियमासह हेल्मेट वापरण्याची समज देण्यात आली. त्याचप्रमाणे हेल्मेट असणाऱ्या दुचाकी स्वरांना, शीट बेल्ट लावणाऱ्या चारचाकी चालकांचे अभिनंदन करून गुलाब पुष्पाने त्यांचे स्वागत करण्यात आले. वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या उपक्रम प्रसंगी दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक राहुल निर्वळ, पोलीस उपनिरीक्षक गणेश गिरी, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, प्लीज कॉन्स्टेबल रोहित चिन्हाळे, संदीप गाडगे आदीची उपस्थिती होती.
