
वाळूजमहानगर – कपडे धुत असताना अचानक तिसगावच्या देवगिरी नदीला पूर आल्याने पाण्यात अडकलेल्या तीन जणींपैकी दोन जणींना नागरिकांनी वाचवले मात्र 14 वर्षीय मुलगी वाहून गेली होती. तिचा मृतदेह आज सोमवारी (ता.12) रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास सारा ग्रिन सोसायटी नजीक मृत्तावस्थेत सापडली. राधा नागजीत जाधव-सावडा (वय 14) असे या मुलीचे नाव आहे.
वाळूज परिसरातील एएस क्लबजवळ राहणाऱ्या हिरुबाई रघु जोगराणा (वय 50), नीतू कालू जोगराणा (वय 17) व राधा नागजी सावडा (वय 14) या तिसगावच्या देवगिरी नदीपात्रात रविवारी रविवारी (ता.11) सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कपडे धूत होत्या. यावेळी जोराचा पाऊस झाल्याने अचानक नदीला पूर आला आणि त्यात हिरुबाई, नितु, व राधा या तीन जणी वाहू लागल्या. मात्र सतर्क नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे दोन जणींना वाचवण्यात यश आले. मात्र राधा ही मुलगी पाण्यात वाहून गेली. त्यामुळे तिचा शोध सुरू केला. मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी तारीख 12 रोजी सकाळी पुन्हा पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राधाचा शोध सुरू झाला. दरम्यान ती सकाळी 9 वाजेच्या सुमारास सारा ग्रिन सोसायटी नजीक नदीतील झाडाझुडपात मृत्तावस्थेत सापडली. तिचा मृतदेह घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आला असून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबीयांचा आक्रोश –
देवगिरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या राधाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. राधा ही एकुलती एक मुलगी होती. तिला दोन भाऊ आहेत. आई वडील राजस्थानी गायी चारून दुधावर उपजीविका भागवतात.