February 5, 2026

 

वाळुज महानगर, (ता.5) – जळगाव येथून छत्रपती संभाजीनगर मार्गे पुण्याला जाणारी एसटी महामंडळाची शिवशाही आराम बस (एम एच 09, ई एम- 2595) गियर बॉक्स मध्ये बिघाड झाल्याने सोमवारी 5 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वाळूज महानगरातील पंढरपुरात फेल झाली. त्यामुळे पुण्याला जाणारे प्रवासी जवळजवळ दोन तास ताटकळले.

पंढरपुरात फेल झालेल्या बसमध्ये महिला, पुरुष मिळून जवळपास आठ प्रवासी प्रवास करत होते. ही बस जळगाव येथून सकाळी 9 वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. दुपारी दोन वाजता छत्रपती संभाजीनगर शहरात पोहचत असताना या बसच्या गिअरबॉक्स मध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे वाहक व चालकांनी ही बस छत्रपती संभाजीनगरच्या डेपोमध्ये दुरुस्तीसाठी नेली होती. तेथे दुरुस्ती करून ही बस दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी छत्रपती संभाजीनगरच्या बस स्टँड वरून पुण्याच्या दिशेने निघाली असता, पंढरपुरात दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास ही बस फेल झाली. त्यामुळे जवळजवळ दोन तास प्रवासी पंढरपुरात अडकून पडले. या बसचे वाहक प्रल्हाद पाटील यांनी काही प्रवाशांना दुसऱ्या बस मध्ये बसवून रवाना केले. मात्र तीन प्रवासी पंढरपुरातच रोडवर आपल्या सामानाच्या बॅगा घेऊन उभे होते. पंढरपुरातील खाजगी मेकॅनिक कडून बसच्या गिअर बॉक्सचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. ही बस पाच वाजेपर्यंत पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या समोर महामार्गावर उभी होती. यावेळी शिवशाही बस विषयी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यातील एका प्रवाशाने सांगितले की, शिवशाही बस जुनाट झाल्या आहेत. त्यामुळे बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शिवशाही बस मध्ये प्रवासी प्रवास करण्याचे टाळतात. एसटी महामंडळाने शिवशाही बसच्या स्थितीकडे लक्ष द्यावे आणि जुनाट बस एस टी च्या ताफ्यातून वगळण्यात याव्यात. अशी मागणी प्रवाशांकडून व्यक्त केली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *