
वाळूज महानगर, (ता.23) – पावसामुळे औद्योगिक क्षेत्रात प्रत्येक वर्षी समस्या निर्माण होतात. चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज, चितेगाव, बीडकिन औद्योगिक क्षेत्रात सखल भागात पाणी साचते व पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ते पाणी आजूबाजूला असणाऱ्या उद्योगांच्या शेड मध्ये शिरते आणि मशीनरी, उत्पादित तसेच कच्चा माल याचे नुकसान होते. परिणामी याची आर्थिक झळ उद्योजकाला सोसावी लागते. त्यामुळे अशा समस्या पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात. अशी मागणी मसिआचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी मंगळवारी (ता.23) रोजी केली. 
औद्योगिक क्षेत्रातील विविध समस्यांवर उपाययोजना कराव्यात. यासाठी मसिआ व म.औ.वि.मं. यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मसिआचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनिल पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता आर. डी. गिरी, उप अभियंता गणेश मुळीकर, नाईकवाडे यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मसीआचे पदाधिकारी व सदस्य उद्योजक यांच्या समन्वयाने विविध समस्यांवर कोणकोणत्या उपाय योजना अंमलात आणता येतील. यावर तसेच या व्यतिरिक्त औद्योगिक परिसरातील कचरा उचलणे, उद्योगांना कमी दाबाने व खंडीत होणार पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट, रस्त्यावर वाहतुकीस येणारे अडथळे, ग्रामपंचायत कर वसूली कार्यप्रणाली, उद्योगांनी स्वत: विकसित केलेले हरित पट्टे एम.आय.डी.सी.ने देखभाल करणे, चिकलठाणा व वाळूज औद्योगिक विभागीतील मुख्य व अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल याविषयी सविस्तर चर्चा झाली. कार्यकारी अभियंता आर डी गिरी यांनी उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच सर्व कामे करण्यासाठी लवकरात लवकर योग्य कार्यवाही केल्या जाईल. असे आश्वासन दिले व पावसाळयापूर्वी करावयाची आवश्यक कामे देखील प्राधान्याने केली जातील. असे आश्वासन मसिआच्या शिष्टमंडळाला दिले. या बैठकीस मसिआचे उपाध्यक्ष चेतन राऊत, अर्जुन गायकवाड, सचिव कमलाकर (विकास) पाटील, राजेंद्र चौधरी, सहसचिव सचिन गायके, कोषाध्यक्ष राजेश मानधनी, प्रसिद्धी प्रमुख अब्दुल शेख, उद्योग संवादचे उपसंपादक अजय गांधी, कार्यकारिणी सदस्य भगवान राऊत, सुदीप अडतीया, मिलिंद कुलकर्णी, राजेश हुंडेकर तसेच म.औ.वि.मं.चे पवार, हरणे, ठाकरे, सोनवणे, खरात यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
