पाणीपुरवठा कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन, वाळूज येथे पाण्यासाठी बोंबाबोंब
गेल्या चार महिन्याचा पगार तसेच निर्वाह निधी थकल्यामुळे वाळूज ग्रामपंचायतचे आठ पाणीपुरवठा कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने वाळूज येथे पाण्यासाठी सर्वत्र बोंबाबोंब सुरू झाली आहे.
गंगापूर तालुक्यातील वाळूज ग्रामपंचायत ही सर्वात मोठी गणल्या जाते. मात्र या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यापासून पगार थकला आहे. शिवाय भविष्य निर्वाह निधी ही खात्यात जमा झालेला नाही. वारंवार पगाराची मागणी करूनही ग्रामपंचायत व संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने अखेर पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी रवीवारी (ता.21) पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अगोदरच वाळुज येथे आठ ते दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा केल्या जातो. अशातच पगार थकल्याने पाणीपुरवठा कर्मचारीही संपावर गेले आहे. परिणामी वाळूज येथे आठ ते दहा दिवसातून होणारा पाणीपुरवठा लांबीवर पडत असल्याने सर्वत्र पाण्या साठी बोंबाबोंब सुरू झाली आहे.
मोटर चालू मात्र पाणी नाही –
पाणीपुरवठा कर्मचारी संपावर गेल्याने वाळूज ग्रामपंचायतच्या अन्य कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा करणारी विद्युत मोटर सुरू केली. मात्र जलकुंभात पाणीच येईना. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची पाहणी केली असता ती दोन ठिकाणी फुटलेली असल्याचे समोर आले आहे. दुष्काळात तेरावा महिना या म्हणीप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत होण्यास उशीर होत आहे.
आधी पगार नंतरच काम –
याबाबत पाणीपुरवठा कर्मचारी अंकुश वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जोपर्यंत आमचा पगार खात्यात जमा होत नाहीत. तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन सुरूच ठेवू. तसेच वेळ प्रसंगी कामगार न्यायालयात धाव घेऊ. असे सांगितले.
पाईपलाईन फुटलेली –
दरम्यान वाळूज ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी उत्तम भोंडवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत पंप सुरू केला. मात्र जलकुंभात पाणी येत नव्हते. त्यामुळे पाईपलाईनची तपासणी केली असता एका पुलाखाली पाईपलाईन फोडली असल्याचे दिसून आले. शिवाय जलकुंभाजवळही पाईपलाईन फुटलेली आहे. अशा दोन ठिकाणची पाईप दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. असे सांगितले.