वाळूजमहानगर, ता.15 – घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून सुमारे 8 लाख रुपये किमतीच्या 11 तोळे सोन्यांचे दागिने लंपास केले. ही घटना पाटोदा येथे बुधवारी (ता.15) भर दिवसा 11.30 वाजेच्या सुमारास गावातील भरवस्तीत घडली. चोरीचा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात आला असून या घरफोडीने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटोदाचे माजी सरपंच कल्याणराव पेरेपाटील हे पत्नी, दोन मुले, सुना यांच्यासह बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून शेतात गेले होते. दरम्यान, त्यांचा मुलगा आनंद हा 2.30 वाजेच्या सुमारास शेतातील कुटुंबीयांसाठी चहा नेण्यासाठी घरी आला असता त्याला घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप गायब असल्याचे दिसले. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्याने वडिलांना फोन करून माहिती दिली. या चोरीत अज्ञात चोरट्यांनी बेडरूममधील सामानांची नासधूस करून व कपाटाचे लॉकर तोडून सोन्याचे 2 गंठण, नेकलेस, कर्णफुले असे जवळजवळ 8 लाख रुपये किमतीचे 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीची माहिती मिळताच उपसरंपच कपिंद्र पेरे, पोलीस पाटील लहु मुचक यांच्यासह नागरिकांची पेरे पाटील यांच्या घरी गर्दी केली. सातारा पोलीस ठाण्याचे पोउपनि भंडारे यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दरम्यान या चोरीतील दोन चोरटे कल्याणराव पेरे पाटील यांच्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तसेच ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आलेल्या गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले आहे.