
वाळूजमहानगर, (ता.3) – नागरी वसाहतीत होत असलेल्या परमिट रूम, बियर बार विरोधात बजाजनगर येथील नागरिक एकवटले असून आज होणारे मुंडन आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा आहे.

बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी प्लॉट नंबर एक्स.147 येथील दारूचा बार (परमिट रूम ) त्वरित हटवा. या मागणीसाठी येथील नागरिक एकवटले असून गेल्या अनेक महिन्यापासून वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करीत आहे. स्थानिकांच्या विरोधामुळे येथील दारूचा बार स्थलांतरित करावा. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. मात्र तरीही येथील बार अद्यापही स्तलांतरीत झाला नाही. परिणामी येथील नागरिक 14 फेब्रुवारी पासून पुन्हा साखळी उपोषण करत आहे. मात्र संबंधित विभाग दखल घेत नसल्याने रविवारी (ता. 2) रोजी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास मुंडन आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र वाळूज एमआयडीसी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
मनोज शिंदे यांनी आंदोलकांना समजावून सांगितल्याने मुंडन आंदोलन स्थगित करून साखळी उपोषण सुरू ठेवले आहे. या उपोषणात इंद्रप्रस्थ सेवाभावी संस्थेचे जगन्नाथअण्णा कोळी, संदीप बहादुरे, नागेश शिंदे, विष्णू मोतीगे, माणिक राजोळे, बाळासाहेब माने, गोविंद गिड्डे, माया बहादुरे, शकुंतला जायभाये, सुप्रिया कोटलवार, सुवर्णा कोळी, शीला शिंदे, भारती चौधरी, शारदा लोहार, रोहिणी माने, यमुना बुलबले, मंगल घुगे, विमल गावंडे, अलका गाडे आदीसह इंद्रप्रस्थ कॉलनीतील नागरिक सहभागी झाले आहेत.
अनेकांनी आश्वासन दिले, परंतु –
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान इंद्रप्रस्थ कॉलनीतील नागरिकांचे या बियर बार व परमिट रूमच्या विरोधात आंदोलन सुरू होते. यावेळी मतांचा जोगवा मागण्यासाठी अनेक नेते पुढारी आले. त्यांनी मोठमोठे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती करून मतदान करून घेतले. मात्र त्यातील कोणीही आश्वासन पाळले नाही.
शासनाचे उंबरे झिजवले –
भर वस्तीत होणाऱ्या या बियर बार व परमिट रूमला नागरिकांचा विरोध आहे. याबाबत अनेकदा आंदोलन व पत्रव्यवहार केले. शासन दरबारी खेड्या मारून उंबरे झिजवले, चपला घासल्या. तरीसुद्धा नागरिकांच्या या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे येथील नागरिकांमधून शासनकर्त्या नेते मंडळी विरुद्ध नाराजीचा सूर दिसून येत आहे.
