
वाळुज महानगर, (ता.15) – घरात झोपलेल्या पती-पत्नीमध्ये काहीतरी कारणावरून वाद झाल्याने अंदाजे 50 वर्षीय पत्नीचा 55 वर्षीय वतीने धारदार कोयत्याने सपासप वार करून खून केला. वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथे घडलेली ही अत्यंत सनसनाटी व हृदयद्रावक घटना रविवारी (ता.15) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहेगाव ता. वैजापूर येथील पूर्व पश्चिम गल्लीत चांगदेव रामराव शेलार हे कुटुंबासह दक्षिणमुखी घरात राहतात. घटनेच्या दिवशी घरातील एका रूममध्ये अनिता (वय अंदाजे 50) व चांगदेव (वय अंदाजे 55) हे पती-पत्नी झोपलेले असताना रात्री त्यांच्यात काहीतरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी चांगदेव शेलार याने पत्नी अनितावर कोयत्याने सपासप वार करून तिचा निर्घृण खून केला. असे सांगितले जाते. पत्नी अनिताचा खून केल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तीच्या मृतदेहा शेजारी चांगदेव हा रात्रभर थांबला. रविवारी (ता.15) रोजी सकाळी ही घटना उघडकीस येताच वैजापूर व छत्रपती संभाजीनगर येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आरोपी चांगदेव शेलार घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व पंचनामा करून मृतदेह घाटीत हलवण्यात आला. दरम्यान स्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र त्यांच्या हाती ठोस काही पुरावा लागला नाही. या घटनेमुळे राहेगावसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सुस्वभावी कुटुंब –
चांगदेव शेलार हे पोस्टमन असल्याने गावात व परिसरात सर्व परिचित आहे. त्यांची पत्नी अनिता व चांगदेव शेलार हे दोघेही सुस्वाभावी होते. त्यांच्यात यापूर्वी कधीही भांडण झाले नाही. असे गल्लीतील लोक सांगतात. रविवारी सकाळी चांगदेव शेलार यांनी पत्नी अनिताचा खून केला. ही माहिती गावभर पसरली. मात्र त्यावर कोणीही गावकरी विश्वास ठेवत नव्हते. शेवटी हकीगत समोर येताच गावकऱ्यांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले.
