वाळूज महानगर, (ता.22) – यात्रा शांततेत पार पडावी, यात्रेत अनुचित प्रकार होऊ नये तसेच महिला भाविकांचे दागिने चोरी होऊ नये. यासाठी सूक्ष्म नियोजन तसेच पोलिसांना मदत व्हावी. म्हणून मंदिर परिसरात 50 सिसिटीव्ही कॅमेऱ्यासह ड्रोन कॅमेर्याद्वारे यात्रा परिसरात निगराणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक गिर्हे यांनी पंढरपूर येथे आयोजित आढावा बैठकीत दिली. 
येथील विठ्ठल रुक्माई मंदिरामुळे वाळूज परिसरातील पंढरपूर हे छोटे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. मराठवाड्यात सर्वत्र या मंदिराची ख्याती आहे. त्यामुळे या छोट्या पंढरपूरात दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरत असते. या यात्रेसाठी मराठवाडाभरातुन वारकरी व भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करीत असतात. गुरुवारी (ता.29) जुन रोजी आषाढी यात्रा असल्याने विश्वस्त मंडळाकडून यात्रेची जय्यत तयारी सुरु करण्यात येत आहे. त्यासाठी येथील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात बुधवारी (ता.21) आढावा बैठक घेण्यात आली. 
विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी, पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, अग्नीशमन विभाग, एमआयडीसी, महावितरण, स्थानिक ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठीकाला पोलिस उपायुक्त दीपक गिर्हे, सहा.पोलिस आयुक्त अशोक थोरात, ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, वाळूजच्या निरीक्षक गिता बागवडे, वाहतुक शाखेचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सचिन इंगोले, साताराचे पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार, पंढरपूरचे माजी सरपंच शेख अख्तर, ग्रामसेवक हरिश आंधळे, वळदगावचे सरपंच अमर डांगर, वडगावचे सरपंच सुनील काळे, महेंद्र खोतकर,
महेबुब चौधरी, कांताराव नवले, कैलास चुंगडे, रोहीत राऊत, एमआयडीसीचे अभियंता रमेश मुंगळीकर, महावितरणाचे अभियंता खाडे, आग्नीशामन विभागाचे घरट, सिडकोच्या मालमता अधिकारी अस्मीता विरशीत, दौलताबाद आरोग्य केंद्र प्रमुख जितेंद्र मनडावले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत दर्शनासाठी येणार्या दिंड्यातील भाविकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, व्हीआयपीसाठी दर्शनपास व सर्वसामान्य भाविकांसाठी बॅरिकेटस, पार्किंग, बससेवा, आरोग्य सेवा, पादत्राणे व्यवस्था तसेच कामगार चौक ते तिरंगा चौक हा रस्ता सर्वप्रकारच्या वाहनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात सुलभ स्वच्छतागृह व फिरते स्वच्छतागृहाची तसेच रुग्णवाहिकेची व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, कचरा उचलण्यासाठी वाहनाची व्यवस्था
आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महावितरण, अग्नीशमन विभाग व स्थानिक ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांना पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी विविध सुचना दिल्या.
