March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.13 – छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागातील 5 हजार 234 एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांपैकी केवळ 1 हजार 436 जणांनी कागदपत्र सादर केले. मात्र कागदपत्र पूर्तते अभावी 3 हजार 798 शिधापत्रिका धारक हे थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेपासून वंचित आहेत. वंचीत असलेल्या एपीएल (शेतकरी) रेशनकार्ड धारकांनी आपले कागदपत्रे पुरवठा विभाग, तहसील कार्यालय छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) येथे 15 जानेवारी 2025 पर्यंत जमा करावे. असे आवाहन तहसीलदार रमेश मुंडलोढ यांनी केले आहे.

एपीएल शेतकरी लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्या ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना प्रती व्यक्ती 170 रुपये प्रती माह प्रमाणे सुरु करण्यात आली आहे. त्यानुषंगाने शासन निर्देशानुसार वेळोवेळी एपीएल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना एपीएल डिबीटी योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याबाबत सर्व रास्तभाव दुकानदार मार्फत योजनेतील पात्र शिधापत्रिका धारकांना सुचित करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील एकूण 5 हजार 234 एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांपैकी 1 हजार 436 शिधापत्रिकाधारकांना आजपर्यंत थेट लाभ मिळाला आहे. मात्र आजही तालुक्यातील 3 हजार 798 शिधापत्रिका धारक हे थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेपासून वंचित आहेत. एपीएल डिबीटी कामकाज त्वरित पूर्ण व्हावे. यासाठी लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांची यादी रास्तभाव दुकानदार तसेच ग्राम महसूल अधिकारी यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यानूसार एपीएल डिबीटी लाभापासून वंचित असणाऱ्या विहित एपीएल शेतकरी लाभार्थ्यांनी नमुन्यातील अर्जासह आवश्यक कागदपत्रे (7/12 छायांकित प्रत, सर्व सदस्यांच्या आधारकार्डाची छायांकित प्रत, महिला सदस्याचे बैंक खाते) संकलित करुन तहसील कार्यालय, पुरवठा विभाग येथे 15 जानेवारी 2025 पर्यंत जमा करावे. ज्या शिधापत्रिकाधारकांचे अर्ज वेळेत जमा होणार नाही त्या शिधापत्रिका एपीएल (शेतकरी) योजनेतून वगळण्यात येणार असून अन्नधान्या ऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेच लाभ न मिळाल्यास स्वतः लाभार्थी यास जवाबदार राहतील. असेही तहसीलदार रमेश मुंडलोढ यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *