March 23, 2026

वाळुज महानगर (ता. 21 ) – योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर संपूर्ण जीवनशैली सुधारण्यासाठी प्रभावी मार्ग आहे. म्हणून आपण फिटनेस असले पाहिजे. फिटनेस हा एक फक्त शब्द नसून निरोगी आणि समृद्ध जीवनासाठी आवश्यक घटक आहे. असे प्रतिपादन इप्का लॅबोरेटरीज लिमिटेडचे मानव संसाधन विभाग प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी शनिवारी 21 जून रोजी केले.

वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज या कंपनीमध्ये शनिवारी 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त कंपनीमध्ये भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी योग गुरु म्हणून पी. इ. एस. आभियांत्रिकी महाविद्यालयाच्या योग अध्यापिका मेघा वर्मा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शिबिराची सुरुवात ॲडव्होकेट सी. एम. पाटील यांच्या प्रारंभिक मार्गदर्शनाने झाली.

डॉ. मैलापूरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “आजच्या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त आहे. योगामुळे केवळ शरीर लवचिक आणि बळकट होत नाही, तर मनाची एकाग्रता, शांती आणि सकारात्मकता देखील वाढते.” त्यांनी पुढे सांगितले की, “सध्याची तरुण पिढी ‘खाणं-पिणं आणि दवाखाना’ यामध्ये अडकली आहे. जर योग्य आहार, मोबाईल वापरावर मर्यादा, आणि नियमित झोप या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर आपण आरोग्यपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतो. योग हा त्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे.”

या शिबिरात कंपनीतील अनेक कर्मचारी सहभागी झाले होते. प्रमुख उपस्थितांमध्ये प्रफुल्ल कांबळे, एकनाथ पवार, अनिकेत सूर्यवंशी, संतोष कोटकर, मनीषा गजभार, रमेश बिरादार, प्रविण शेळके, सखाराम गोळे, संदीप यादव, नारायण मनाळ, ज्ञानदेव थोरात आदींचा समावेश होता. सर्वांनी योगाभ्यासात उत्साहाने भाग घेतला आणि नियमित योग केल्यास त्याचे फायदे काय असू शकतात हे प्रत्यक्ष अनुभवलं.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *