वाळूज महानगर –
वळदगाव पंढरपूर दरम्यान खाम नदीला पावसाळ्यात नेहमी पूर येतो. त्यामुळे येथील नळकांडी पूल पाण्याखाली जातो. या पुराच्या पाण्यात वळदगावच्या माजी उपसरपंचासह जवळजवळ सहा जणांचा बळी केला आहे. मात्र निगरगट्ट शासनाच्या दुर्लक्षामुळे या नदीवर पूल होईना. वारंवार पुलासाठी पाठपुरावा करूनही त्याकडे कानाडोळा होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वाळूज परिसरात गुरुवारी (ता.1) रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे वाळूज औद्योगिक वसाहतीला जोडणार्या वळदगाव येथील खामनदीला सायंकाळी मोठा पुर आला. या पुरामुळे वळदगाव येथील कमी उंचीचा नळकांडी पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे गावकरी, विद्यार्थी आणि कामगारांना जीव धोक्यात घालून पूल पार करत घर गाठावे लागले. पुराचं पाणी पुलावरून वाहील्याने काही दक्ष गावकर्यांनी या पूलावरुन येणाऱ्या नागरिकांना पूल न ओलांडून येण्याचा सल्ला दिला. यामुळे पुराचं पाणी ओसरेपर्यंत अनेकांना प्रतिक्षा करावी लागली. तसेच काही वाहनधारक नागरिकांना एएस क्लब-लिंक रोड चौक आणि वाल्मी-बजाजगेट मार्गे अधिक वेळ व इंधन खर्च करून घर गाठावे लागले.
विशेष म्हणजे या पुलाची उंची अत्यंत कमी असल्याने दरवर्षी अनेक निष्पाप व्यक्तीचा रात्री बेरात्री पुरावरील पाण्याचा अंदाज येत नसल्याने जीव गमवावा लागला. मात्र या पुलासाठी गावकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही निगरगट्ट शासनाला जाग न आल्याने वळदगाव येथील पूल होईना. त्यामुळे गावकर्यांमध्ये तिव्र नाराजी दिसून येत आहे.