वाळूजमहानगर, ता.26 – सकाळी उठून रनिंग करताना नायलॉन मांजा पायात अडकला. हा प्रकार एकदा नव्हे तर दोनदा झाला. त्यामुळे बजाजनगर येथील एका लघु उद्योजकाने थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून वाळूज औद्योगिक परिसरात नायलॉन मांजा विक्री थांबवण्याची मागणी केली आहे.
या पत्रात लघु उद्योजक सुरेश फुलारे यांनी असे म्हटले आहे की, वाळूज औद्योगिक परिक्षेत्रात नायलॉन मांजा विक्री या गंभीर विषयी कळविण्यात येते की, वाळूज औद्योगिक क्षेत्रात नायलॉन मांजा विक्री केली जात आहे. मी 20 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता रणींग करत असताना दोन वेळा नायलॉन मांजा पायात अडकला. पहिल्यांदा दुर्लक्ष केले, परंतु दुसऱ्यांदा परत मांजा अडकल्याने अडखळून पडता पडता थांबलो. मी तो मांजा पायातून काढून गुंडाळून घेतला. व त्याचा फोटो काढून हे पत्र लिहिले. नायलॉन मांजामुळे आतापर्यंत अनेक दुचाकी चालकाचे गळे कापले गेले आहे. हे माहीत असूनही दुकानदार नायलॉन मांजा सर्रास विकत आहे. म्हणूनच तो मिळत आहे. व मिळतो म्हणून मुले घेतात, पतंग उडवतात. व तुटला की, सोडून देतात. त्यामुळे पक्षी, प्राणी व माणसे जखमी होतात. गुटखा बंदी आहे. तरीही रस्त्यावर गुटखा खाऊन लोकं थूकलेले दिसतातच. परंतु आम्ही कधी तक्रार केली नाही. गुटखा खाणारे खातात, विकणारे विकतात. त्यातून लाभ मिळवणारे मिळवतात. आम्हाला त्रास होतो, तो फक्त ‘येथे थुंकू थुंकू नये’. असे लिहिलेल्या ठिकाणी गुटखा खाऊन रंगवलेल्या भिंती पाहिल्याचा. पण येथे मात्र नुसतं बघायचं नाही, तर मांजा पायात अडकल्याने पडायचं आहे. म्हणून पत्र लिहिलय. तरी या गंभीर बाबीचा गांभीर्याने विचार करून तत्काळ कारवाई करावी व सहकार्य करावे. कारवाई न केल्यास कुठलेही आंदोलन केले जाणार नाही. आधीच मराठा आरक्षणसाठी जोर बैठक आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचा आज 59 वा दिवस आहे. व 69 जोर बैठक मारणार आहे. त्यामुळे नवीन आंदोलन केले जाणार नाही. याची नोंद घ्यावी. एक नायलॉन मांजा पायात अडकल्याने अडखळलेला सुरेश फुलारे. असेही या पत्रात लिहिले आहे.