
वाळूजमहानगर, (ता.9) – मुलीला एअर होस्टेस करण्यासाठी लावण्यात आलेल्या शिकवणीचे 1 लाख 65 हजार रुपये नातेवाईकाच्या मोबाईलवर पाठवण्यात आले. मात्र त्याने फक्त 69 हजारच रुपये भरले. ते सुद्धा दिलेल्या मुदतीत न भरल्याने भुर्दंड तर बसलाच. शिवाय स्वतःकडे ठेवून घेतलेले 70 हजार रुपये देण्यास टाळाटाळ करत विश्वासघात करून फसवणूक केल्याने महिलेने पोलीसात धाव घेतली. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सविता कुमार पगारे (38) ही महिला वडगाव (को.) येथे साक्षी आणि सृष्टी या मुलीसह राहून खाजगी कंपनीत नोकरी करते. तिची मोठी मुलगी साक्षी (19) ला एअर होस्टेस मध्ये करीअर करायचे असल्याने तिने ठाणे येथील जाऊबाई लता श्यामराव पगारेला फोन करुन एअर होस्टेसच्या क्लासेस बाबत विचारले. त्यांनी बहिणीचा मुलगा जितेश नागपुरे याचा रेफरन्स दिल्याने त्याच्या मार्फतीने क्लासवर जाऊन माहिती घेतली. सर्व मिळून 1 लाख 65 हजार रुपये फी ठरली. फी भरण्यासाठी 4 टप्पे असून 3 महिन्याच्या आत न भरल्यास वाढेल. असे सांगितले. त्यामुळे ऍडमिशन घ्यावे की, नाही या विचारात असतानाच नागपुरे पगारेबाई यांना म्हणाला की, तुम्ही माझ्या फोन पे वर पैसे पाठवत जा. मी व्यवस्थित करून घेतो. त्यावर विश्वास ठेवून पगारे यांनी 3 एप्रिल 2023 रोजी 10 हजार रुपये फ्रॅकफिन क्लासेस येथे मुलीचे अँडमिशन केले. दुसऱ्या दिवशी 5 हजार रुपये नागपुरे याला फोन पे करुन क्लासेसच्या ठिकाणी जमा करण्यास सांगितले. त्यानंतर फोन पे वरून नागपुरेला वेळोवेळी एकूण 1 लाख 65 हजार रुपये पाठवले. मात्र नागपुरे याने त्यापैकी 69 हजारच रुपये क्लासेसला जमा केले. व बाकी पैसे स्वतःसाठी ठेवुन घेतले. त्यानंतर क्लासेस मधून सविता पगारे यांना फीस भरण्यासंदर्भात फोन आला तेव्हा नागपुरे याचे पितळ उघडे पडले. शिवाय फी वेळेत भरली नाही. म्हणून वीस हजार रुपये भुर्दंड लागला. त्यानंतर पगारे यांनी नागपुरे याच्याकडे पैसे परत मागितले असता त्याने उडवा-उडवीचे उत्तरे दिली. मुलीच्या भविष्याचा विषय असल्याने व घरात एकटी कमवती असल्याने सतत पैशाचा तगादा, विनवण्या केल्याने 25 हजार रुपये परत दिले. मात्र उर्वरित 70 हजार रुपये परत देत नसल्याने महिलेने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी जितेश अशोक नागपुरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
