
वाळूजमहानगर, (ता.15) – नाकाबंदी दरम्यान संशयावरून पोलिसांनी दुचाकीवर येणाऱ्या डॉक्टरला थांबवून 500 रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी आपापसात वाद झाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तेथेही समेट झाली नाही. दरम्यान याच प्रकरणावरून ग्रामीणच्या एका पोलीस उपनिरीक्षकाने वाळुज एमआयडीसीच्या पोलीस उपनिरीक्षकाला अरेरावी केल्याने पोलीस दप्तरी नोंद झाली. त्यानंतर प्रकरण अधिक चिघडले. आणि वाळूज एमआयडीसी पोलीस व वाळूज महानगर डॉक्टर्स असोसिएशन आमने सामने आले. 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नियोजित दौऱ्यानिमित्त वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनानंबरची वाहने, इसम, संशयीत वाहने तपासणी व चेकिंग करण्यासाठी रविवारी (ता.11) रोजी 11 ते 2 वाजे दरम्यान नाकाबंदी करण्यात आली होती. पोलीस ठाण्याच्या समोरील चौकात नाकाबंदी दरम्यान अंदाजे दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे व पोलीस कर्मचारी हे नाकाबंदी करीत असतांना दुचाकी (एम एच 20, जी एम -3497) वरील स्वाराला थांबवण्याचा इशारा केला. मात्र तो थांबला नाही. व पुढे रस्त्यामध्ये गाडी थांबवून अरेरावीमध्ये पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांना बोलला. त्यावर त्यांनी त्यास त्याचे लायसन व वाहनाचे कागदपत्राबाबत विचारले असता, ते नसल्याचे सांगीतले. म्हणून त्यांचे वाहन पोलीस स्टेशनला लावलण्यासाठी घेवून येत असतांना त्या इसमाने पोलीस उपनिरीक्षक शिंदे सोबत बाचाबाची केली होती. याप्रकरणी मोटर वाहन कायदा कलम 130 (1) /177 प्रमाणे 500 रुपये दंडाचे चालन करून वाहनासह सोडण्यात आले होते. डॉ. श्रीराम बाबासाहेब मते असे दंड ठोठावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या डॉक्टरला समजावून सांगून प्रकरण त्याच दिवशी आपसात मिटले होते. मंगळवारी (ता.13) रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण कंट्रोल रूमचे पोलीस उपनिरीक्षक नवनाथ अशोक पाटवदकर हे वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांना भेटुन डॉ. श्रीराम मते यांच्या प्रकरणाबाबत वाद घातला. म्हणून शिंदे यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे स्टेशन डायरीत नोंद घेतली. पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी स्टेशन डायरीत नोंद घेतली म्हणून पोलीस उपनिरीक्षक नवनाथ अशोक पाटवदकर यांनी त्यांच्या ओळखीचे डॉ.मते यांना या प्रकरणामध्ये वाढुनचढून सांगून डॉक्टर असोसिएशन एकत्र करून पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्या विरुध्द निवेदन देण्यास सांगीतले.
डॉक्टर असोसिएशन आक्रमक –
याबाबत वाळूज महानगर डॉक्टर्स असोसिएशन आक्रमक झाली असून त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाकाबंदी दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी डॉक्टर श्रीराम मते यांची दुचाकी अडवून त्यांना लायसन व कागदपत्राची मागणी केली. त्यानंतर मते यांनी लायसन्स दिले. मात्र गाडीच्या कागदपत्रासाठी वेळ मागितला असता, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी डॉक्टरला अरेरावीची भाषा करत पोलीस ठाण्यात बोलावले. मात्र मी डॉक्टर आहे, पोलीस ठाण्यात येऊ शकत नाही. असे वारंवार सांगूनसुद्धा बेकायदेशीर रित्या कायदा हातात घेऊन पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी डॉक्टर श्रीराम मते यांची कॉलर पकडून काठीने मारहाण केली. तसेच फरपटत पोलीस ठाण्यात नेऊन कोऱ्या कागदावर सही व अंगठा घेतला. त्यानंतर अरेरावी करत पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. असा आरोप वाळूज डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आला. 
तसेच वाळूज महानगर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.14) रोजी पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्याविरुद्ध निवेदन दिले. व शिंदे यांनी माफी मागावी. माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई व वरिष्ठ पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची व गुन्हा नोंद करण्याची मागणी करणार आहे. असेही वाळुज महानगर डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
