March 23, 2026


बजाजनगर, (ता.20) – वाळूज औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीकडे जागा शिल्लक नसल्यामुळे नाईलाजाने रांजणगाव, बनकरवाडी शिवारातील जागेवर लघु उद्योजकांनी कारखाने उभारले. मात्र या कारखान्यांना महावितरणकडून देण्यात आलेल्या कमी क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरमुळे वीज पुरवठा नेहमी खंडीत होत होता. या नेहमीच्या समस्येमुळे येथील लघुउद्योजक त्रस्त झाले होते. त्यामुळे मासिआच्या पाठपुराव्याने अखेर येथील जुना 5 एमव्हिए क्षमतेचा सत्यम फिडर ट्रान्सफॉर्मर काढून 10 एमव्हीए अर्थात दुप्पट क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. परंतु या नवीन ट्रान्सफॉर्मरमध्येही तांत्रिक बिघाड आला आणि या कारखान्याच्या परिसरातील विद्युत पुरवठा जवळपास 18 ते 20 तास खंडित झाला. त्यामुळे लघुउद्योजकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामुळे त्रस्त झालेल्या लघु उद्योजकांनी अखेर वाळूज एमआयडीसीतील महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. त्यामुळे तांत्रिक बिघाड दूर करून 20 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. त्यामुळेलघु उद्योजकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
रांजणगाव शे. पू. शिवारातील तलावाशेजारी व बनकरवाडी गट नंबर येथे अनेक वर्षापासून सुरु असलेले शेकडो छोटे मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांची संख्या शेकडोंच्या घरात असूनही येथे कमी क्षमतेचे ट्रांसफार्मर होते. त्यामुळे येथील कारखान्यांना होणारा वीज पुरवठा नेहमीच खंडीत होत होता. तर कधी कमी दाबाने होत होता. या समस्येतून लघु उद्योजकांना मुक्त करण्यासाठी मासिआने पुढाकार घेऊन महावितरणकडे सतत पाठ पुरावा केल्यामुळे येथे जास्त क्षमतेचे नवीन विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले होते.
परंतु या ट्रान्सफॉर्मरमध्येही अचानक बबल नावाचा तांत्रिक बिघाड आला. त्यामुळे रविवारी (ता.18) रोजी दिवसभर या परिसरातील विद्युत पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी खंडित झाला होता. रविवारी रात्री विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु सोमवारी (ता.19) रोजी सकाळी या भागातील विद्युत पुरवठा पुन्हा अचानक खंडित झाला. त्यामुळे येथील जवळपास 15 लघु उद्योजकांनी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अतिरिक्त कार्यकारी अभियंता वाळूज औद्योगिक क्षेत्र या महावितरणच्या कार्यालयावर धाव घेतली होती. यावेळी त्यांनी महावितरणच्या ढिसाळ कारभाराविषयी रोष व्यक्त केला. उद्योजकांना दुरुस्तीमुळे विज पुरवठा बंद राहील. अशी पूर्व सूचना देण्यात आली नाही. असा आरोप यावेळी उद्योजकांनी केला.
अखेर मोरे चौकातील मासिआ कार्यालयात मासिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, उपाध्यक्ष राहुल मोगले यांची लघुउद्योजकांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मासिआच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क साधला. त्यानंतर 12.30 वाजेच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरचे दुरुस्तीचे काम महावितरणने पूर्ण केले व विज पुरवठा सुरळीत सुरू झाला.

प्रतिक्रिया….
सचिन बनसोडे, अभियंता महावितरण ग्रामीण विभाग, वाळूज –
येथील विज पुरवठा आता सुरू झाला आहे. ट्रान्सफॉर्मरमध्ये ‘बबल’नावाचा तांत्रिक बिघाड झाल्याने विज पुरवठा खंडित झाला होता. रविवारी या भागातील बहुतांशी कारखाने बंद असतात. यामुळे युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. आता येथील कारखान्यांना नेहमीसाठी मुबलक प्रमाणात अखंडित वीज मिळेल. नवीन ट्रान्सफॉर्मरची टेस्टिंग करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेचे होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *