
वाळूजमहानगर, (ता.12) नव्या घराची ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून नमुना नंबर 8 अ चा उतारा देण्यासाठी 9 हजाराची मागणी करणाऱ्या साजापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (ता.12) रोजी रंगेहात पकडून जेरबंद केले.
या प्रकरणातील तक्रारदार यांचा साजापूर शिवारातील क्रांतीनगरात नवीन घर बांधले आहे. या घराची ग्रामपंचायतमध्ये नोंदणी करून नमुना नंबर 8 (अ)चा उतारा देण्यासाठी साजापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी रामकृष्ण बारकु निकम (53) याने घराचा थकीत 4 हजाराचा कर व घराचा उतारा देण्यासाठी 5 हजार असे एकुण 9 हजाराची मागणी केली होती. तक्रारदारास लाच देण्याची ईच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकाराची माहिती दिली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलिस अधिक्षक विशाल खांबे, उपअधिक्षक पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रेश्मा सौदागर, पोहेकॉ राजेंद्र जोशी, पोना. भूषण देसाई, पोना.दिंगबर पाठक आदींच्या पथकाने गुरुवारी (ता.12) साजापूरात ग्रामविकास अधिकारी निकम यांना पकडण्यासाठी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे दुपारी 2 वाजेच्या सुमारास तक्रारदार नमुना नंबर 8 अ चा उतारा घेण्यासाठी साजापुर ग्रामपंचायत कार्यालयात गेले होते. यावेळी ग्रामविकास अधिकारी निकम यांनी लाचेची रकम स्विकारताच ग्रामविकास अधिकारी निकम याला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी लाचखोर रामकृष्ण निकम याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
