
वाळूज महानगर, (ता.9) – लहानपणापासून सोबत असलेल्या व एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या जिवलग मित्रानेच 20 वर्षीय तरुणाला धारदार चाकूने भोसकून त्याचा काटा काढला. मात्र वाळूज पोलीसांनी अवघ्या काही तासातच आरोपीच्या परभणी येथे वाटा अडवून ताब्यात घेतले. ‘एक फुल, दो माली’ या चित्रपटाला साजेशी ही घटना वाळूज येथे बुधवारी 8 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज येथील लांजी रोडवर, नारायणनगर येथे शिवराई स्मशान भुमी विरुध्दच्या गल्लीत राहणारा प्रथमेश प्रभाकर गायकवाड (20) बुधवारी 8 ऑक्टोंबर रोजी रात्री 9 वाजता जेवण करुन नेहमी प्रमाणे बाहेर गेला. त्याच्या गल्लीतील सुजीत देवघाटोळे व विकास मनाळ हे नेहमी प्रथमेश सोबत गप्पा मारत लांझी रोडवर बंद दुकानासमोर बोलत असतांना एका दुचाकीवरुन रितेश नरवडे व त्याचा मित्र प्रदीप सुकासे असे दोघे तेथे आले. रितेश हा प्रथमेश सोबत थोडेवेळ बोलला व रितेशने प्रथमेश याच्या बरगडीत धारदार चाकुने भोसकले. त्यामुळे तो रक्तबंबाळ होवुन त्याच्या थारोळ्यात पडला. ही माहिती मिळताच प्रभाकर गायकवाड हे घटनास्थळी धावत आले. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता रितेश याने तुम्ही मधी येवु नका. असे म्हणुन चाकुचा धाक दाखवत प्रदीप सुकासे याच्यासह दुचाकीवर पळून गेला. दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी प्रथमेश याला प्रभाकर गायकवाड यांनी 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे यांच्या मदतीने घाटी दवाखाना, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले. याप्रकरणी प्रभाकर रामचंद्र गायकवाड (वय 45 वर्ष) रा. नारायणनगर, वाळुज, ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
लहानपणा पासुनचा मित्र –
प्रथमेश प्रभाकर गायकवाड (वय 21 वर्ष ) व रितेश विजय नरवडे (वय 21 वर्ष) हा आधुनमधुन एकमेकांच्या घरी येत असे. ते दोघे शाळेत सोबत होते. तेव्हापासुनचे ते मित्र आहेत. मागील काही दिवसापासुन त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरुन वैमनस्य निर्माण झाले. नवरात्राच्या 6 व्या माळेच्या दिवशी रितेश हा त्याच्या आईला घेवुन गायकवाड याच्या घरी भांडण्यासाठी आला होता.
पाच ते दहा मिनिटात घटना –
प्रथमेश हा जेवण करून बाहेर गेला मात्र, बराच वेळ झाला तरी तो आला नाही. म्हणुन प्रभाकर गायकवाड यांनी फोन केला तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. त्याने फोन उचलला व सांगितले की, पाच ते दहा मिनीटात येतो. त्यांनतर पाच ते दहा मिनीटानी गल्लीतील सुजीत देवघाटोळे व विकास मनाळ हे धावत घरी आले. व प्रभाकर गायकवाड यांना ओरडुन सांगितले की, प्रथमेश याला रितेश नरवडे याने चाकु मारला. ही माहिती मिळताच येऊन असता पाहीले असता प्रथमेश हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.
पोलिसांनी अडवल्या आरोपीच्या वाटा –
या चाकू हल्ल्यात प्रथमेश गायकवाड हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे लक्षात येताच आरोपी रितेश नरवडे व त्याचा मित्र प्रदीप सुकासे हे फरार झाले. दरम्यान वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून आरोपीचा शोध सुरू केला. त्यांचा पाठलाग करत वाळूज पोलिसांनी फरार आरोपींच्या परभणी येथे वाटा अडवल्या. आणि जेरबंद केले.
एक फुल दो माळी –
या प्रकरणातील प्रथमेश आणि रितेश या दोघांचेही एकाच प्रेयसीवर प्रेम होते. त्यातूनच हा भयानक प्रकार समोर आला असल्याचे पोलिसांकडून समजते. एक फुल दो माली या हिंदी चित्रपटाला साजेशी घटना आहे. एक प्रेयसी आणि दोन प्रियकर करायची ही घटना वाळूज येथे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
