वाळूजमहानगर, ता.9 – दोन वाजेच्या सभेसाठी सकाळपासून तयारी करून 1 वाजेच्या सुमारास सभास्थळी आलेले मतदार देवा भाऊची वाट पाहून पाहून कंटाळल्याने अखेर त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचे दिसून आले. मात्र त्यानंतर सभेच्या नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तास उशिराने सभा सुरू झाली.
विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे आमदार प्रशांत बंब यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवा भाऊ यांच्या सभेचे आयोजन शनिवारी (ता.9) रोजी दुपारी 2 वाजता करण्यात आले होते. या सभेसाठी गर्दी व्हावी म्हणून तालुक्यातून अनेक मतदार आणण्यात आले होते. दोन वाजेची सभा असल्याने एक वाजेपासूनच सभास्थळी कार्यकर्ते, मतदारांची गर्दी झाली होती. एक वाजेपासून आलेले मतदार देवा भाऊची सभा ऐकण्यासाठी ताटकळले. मात्र पाच वाजले तरी देवा भाऊ सभास्थळी आले नाही. त्यामुळे वाट पाहून पाहून मतदारांनी सभास्थळापासून काढता पाय घेतला. त्यामुळे सभा मंडपातील अनेक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या.
अखेर देवा भाऊ हेलिकॅप्टर मधून उतरले आणि 5.51 वाजता सभेला सुरुवात केली.