वाळूजमहानगर (ता.25) :- एकापाठोपाठ एक जाणाऱ्या दोन दुचाकींचा एकमेकींना धडकून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. वाळूज पंढरपूर दरम्यान बजाज कंपनी समोर झालेल्या या अपघातात दोन जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमीस 108 रुग्णवाहिकेतून उपचारात दाखल करण्यात आले. हा अपघात शुक्रवारी (ता.25) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास झाला.
प्रत्यक्ष दर्शीने सांगितल्यानुसार या अपघातातील दोन्ही दुचाकी पंढरपूरकडून वाळूजकडे येत होत्या. या दोन्ही दुचाकी बजाज कंपनी जवळ येताच एक व्यक्तींना धडकल्या. यात दोन्ही दुचाकीवरील तीन जणांपैकी दोन जण जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी पोलिसांसह 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे यांनी अपघातस्थळी धाव घेत दुचाकी (एम एच 20, एफ आर – 5926) वरील जखमी आकाश वाघ रा. महालगाव ता. वैजापूर जि. औरंगाबाद याला उपचारार्थ दाखल केले.
दरम्यान या अपघातातील अन्य दुचाकीवरील एक जखमी पंढरपूर येथील दवाखान्यात नातेवाईकांसह दाखल झाला. मात्र त्याचे नाव व पत्ता मिळू शकला नाही.