
वाळुज महानगर,(ता.2) – भरधाव जाणाऱ्या दोन मालवाहू ट्रक मध्ये समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील चिकठाण फाट्यावर मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8:0 वाजेच्या सुमारास झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी 2 सप्टेंबर रोजी सकाळी 8: 30 वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक (एम एच 13, सी यु – 4444) हा छत्रपती संभाजीनगरकडून मक्का घेऊन पुण्याकडे जात होता. तर ट्रक (एम एच 18, बीए – 3771) हा लोखंडी पत्रा घेऊन पुण्याकडून टेंभापुरी फाट्याजवळ असलेल्या एका कंपनीकडे येत होता. 
यातील दोन्हीही ट्रक भरधाव असताना पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने चिकठाण फाट्यावरून टेंभापुरीकडे वळण घेतले. त्याच वेळी मकाचा ट्रक आला आणि दोन्ही ट्रक मध्ये समोरासमोर जोराची धडक होऊन अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्हीही ट्रकच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मका घेऊन जाणारा ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे महामार्गावर सर्वत्र मका पसरून मोठे नुकसान झाले. या अपघातात दोन्हीही ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मका घेऊन जाणाऱ्या ट्रकचा चालक आत मध्ये अडकून पडला.
या अपघातास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी ट्रकचे केबिन केबिन तोडून जखमी ट्रक चालकाला बाहेर काढले. त्यासाठी त्यांना जेसीबी मशीनची मदत घ्यावी लागली. हनुमंत नामदेव मोहटे, (वय 45) रा. म्हाडा ता. जि.सोलापूर आणि विश्राम डावर (वय 35) रा. शेंदवा, (रा. मध्य प्रदेश) अशी या अपघातात जखमी झालेल्या चालकांची नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी पॉईंटवर असणारी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधामच्या रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालय (घाटी) संभाजीनगर येथे दाखल केले. वाळूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक नारायण बुट्टे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दशरथ खोसरे आदींनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने उचलून वाहतूक सुरळीत केली.
