February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.29) – दोन कामगारांमध्ये शुल्लक कारणावरून हुज्जत झाल्याने एकाने दुसऱ्याला ढकलून दिले. त्यामुळे तो कंपनीतील लोखंडी प्लेटवर पडल्याने ती डोक्यात घुसून 25 वर्षीय चालक असलेला कामगार ठार झाला. ही घटना शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक वसाहतीत घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वरचुणा पो. आडुळ, ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली येथील चंद्रमुनी साहेबराव कांबळे (वय 25) हा वाळूज औद्योगिक वसाहतीतील साहिल अँटो या टेक्नॉलॉजी कंपनीत चालक म्हणून काम करीत होता. तो रांजणगाव (शेणपुंजी) येथील शिवनेरी कॉलनीत एकटाच भाड्याने राहत होता. शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास चंद्रमुनी हा त्याच्या भावाच्या घरी आला होता. त्यानंतर तो अमोल गजानन खाडे व दिपक गुलाब लहाने तसेच चंद्रमुनीच्या कंपनीत काम करणारा लक्ष्मण ज्ञानेश्वर वाढेकर यांच्याकडे गेला. काही वेळाने ते चौघेजण चंद्रमुनीच्या दुचाकीवर बसुन तेथुन युपी ढाबा येथे गेले. तेथे थोडा वेळ थांबुन चंद्रमुनी काम करत असलेल्या

साहिल अँटो या टेक्नॉलॉजी कंपनीसमोर गेले. तेथे चंद्रमुनी व लक्ष्मण वाढेकर यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले. यावेळी त्यांच्यात चांगलीच हुज्जत होऊन लोटालोटी झाली. त्यात लक्ष्मण वाढेकर याने चंद्रमुनी यास ढकलुन दिल्याने तो त्या कंपनीसमोरील पार्किंग शेड मधील लोखंडी प्लेटवर पडला. त्या प्लेटचा कोना चंद्रमुनीच्या डोक्यास लागल्याने तो जखमी होऊन तेथेच बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहुन कंपनीतील कॅज्युअल कामगार रविद्र भगवान हिवाळे व वाँचमन बापुराव शिंदे तसेच कंपनीतील इतर कामगार आले. त्याचवेळी लक्ष्मण वाढेकर हा तेथुन पळुन गेला. चंद्रमुनी बेशुद्ध पडल्याने कंपनीतील एच आर शिवशंकर सविता तसेच रविंद्र हिवाळे, कैलास बोबडे व अभिषेक जाधव यांनी चंद्रमुनी यास उपचारार्थ प्रथम बजाजनगर येथील खाजगी दवाखान्यात व त्यानंतर घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन चंद्रमुनी यास मयत घोषीत केले.


याप्रकरणी अमोल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी लक्ष्मण ज्ञानेश्वर वाढेकर रा जामवाडी, जि जालना याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
————====——–

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *