
वाळूजमहानगर, (ता.23) – विनापरवाना व बेकायदेशीर रित्या साठवून ठेवलेल्या देशी दारूच्या गोडाऊनवर दस्तूर खुद्द पोलीस उपायुक्तांनी छापा मारून जवळजवळ वीस लाख रुपये किमतीचे बॉक्स असलेल्या देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. ही कारवाई गुरुवारी (ता.23) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वाळुज औद्योगिक वसाहतीत करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टर मध्ये नशा आणणारे व गुंगीकारक पदार्थ बेकायदेशीर व अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली.
त्यामुळे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी स्वतः तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, वाळूज एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक अविनाश आघाव, पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे, दारूबंदी विभागाचे गणेश उंडे, ड-1, पोउपनि कदम, पोलीस हवालदार राजेंद्र साळुंके, बबन ईप्पर आदींनी तेथे गुरुवारी (ता.23) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास छापा टाकला.
तेथे संजय कवडे यांच्या गोडाऊन मध्ये आरोपी अतुल चक याने बेकायदेशीर व अवैधरित्या शासनाचा कर चुकवून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला देशी दारूचा साठा आढळून आला.
यावेळी पोलिसांनी दोन टेम्पो भरून 19 लाख 58 हजार 880 रुपये किमतीच्या भिंगरी, संत्रा, टॅंगो देशी दारूचे खाकी रंगाच्या पुठ्यांच्या बॉक्स. त्यावर देशी दारू भिंगरी संत्रा, के.एस. के डिसलरी, कोळपेवाडी, अहमदनगर असे लिहीलेले असून एका बॉक्समधे एकूण 48 देशी दारूच्या बाटल्या आहेत. हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी प्रताप धर्मसिंग कवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अतुल रमेश चक वय 35, रा. बजाजनगर व गोडाऊन मालक संजय कवडे यांच्याविरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
