
वाळूज महानगर, (ता.27) – ‘देव तारी, त्याला कोण मारी’ अशी एक म्हण आहे. ही म्हण बुधवारी प्रत्यक्षात पंढरपूरकरांना अनुभवाला मिळाली. त्याचे झाले असे की, छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका दुचाकीचा दुसऱ्या दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे 30 र्षीय दुचाकीस्वार रस्त्यावर पडून जखमी झाला. त्याचवेळी पाठीमागून यमरूपी कंटेनर येत होता. हा कंटेनर रस्त्यावर जखमी होऊन पडलेल्याला चिडणार तोच देवरूपी पंढरपूर येथील नागरिकांनी जोराचा आवाज दिला. त्यामुळे कंटेनर चालकाने क्षणार्धात ब्रेक दाबले. आणि त्या तरुणाचे प्राण वाचले. ही घटना बुधवारी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळीच्या सुमारास पंढरपूर येथील मुख्य महामार्गावर घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दुचाकी (एमएच 20, एचजी- 6885) वरून जात असलेल्या संजय कदम (वय अंदाजे 30), रा. एन-6, टीव्ही सेंटर, छत्रपती संभाजीनगर यांना एका अनोळखी दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करताना धडक दिली. त्यामुळे कदम यांची दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि त्याच वेळी पाठीमागून कंटेनर (डी डी 01, ए सी- 9737) आला. 
हा कंटेनर कदम याच्या अंगावर जाणार तोच स्थानिक नागरिकांनी मोठ्याने आवाज दिला. त्यामुळे कंटेनर चालकाने तात्काळ ब्रेक लावले. चालकाच्या या तत्परतेमुळे कदम यांचा जीव थोडक्यात वाचला. धडक देणारा अनोळखी दुचाकीस्वार मात्र घटनास्थळावरून पसार झाला.
अपघातानंतर पंढरपूरमधील नागरिकांनी तत्परता दाखवत जखमी कदम यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाच्या चातुर्य आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे हा मोठा अपघात टळल्याची भावना पंढरपूर परिसरात व्यक्त होत आहे. पोलिसांकडून धडक देऊन पळून गेलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेतला जात आहे.
