
वाळुज महानगर, (ता.15) – भरधाव जाणारा टेम्पो आणि दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीवरील एक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ढोरेगाव येथे झाला. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालाची वाहतूक करणारा अशोक लेलँड टेम्पो (एम एच 14, एल एल – 8994) व दुचाकी (एम एच 20, एफ टी – 7489) या दोन्ही वाहनांमध्ये धडक होऊन दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी झाला. छत्रपती संभाजी नगर ते पुणे महामार्गावर मंगळवारी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोरेगाव येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच दहेगाव बंगला येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांच्या मदतीने श्री नरेंद्रचार्य महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेचे पायलट संदीप त्रिंबके यांनी जखमी जगन्नाथ गोधाजी आव्हाड (वय 55) रा. मांगेगाव तालुका गंगापूर याला उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.

असा झाला अपघात –
या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मांगेगाव येथील दुचाकीस्वार जगन्नाथ आव्हाड हा गंगापूरच्या दिशेने जात होता. तो ढोरेगाव येथे येताच तेथील दुभाजकाच्या कट पॉईंटमधून टेम्पो अचानक मध्ये घुसला. त्यामुळे हा अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
