
वाळुज महानगर, (ता.14) – भरधाव जाणारा कंटेनर आणि त्या पाठोपाठ येणारी दुचाकी यांच्यात अपघात होऊन दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. हा अपघात रविवारी 14 डिसेंबर रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास वाळूजजवळ झाला.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूरकडून पुण्याच्या दिशेने वाळूज मार्गे जाणारा कंटेनर (एम एच 46, बीबी- 3275) हा भरधाव जात होता. या कंटेनर पाठोपाठ दुचाकी (एमएच-20, जी यु- 0708) होती. ही दोन्ही वाहने एकाच दिशेने पंढरपूरकडून वाळुजकडे येत असताना त्यांच्यात जोराची धडक झाली. वाळुज येथील हनुमाननगर समोर रविवारी 14 डिसेंबर रोजी रात्री 7:45 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीच्या समोरील भागाचा चुराडा होऊन
दुचाकीवरील विशाल रोहिदास वाघचौरे (वय अंदाजे 25 वर्ष) रा. खांडे पिंपळगाव, ता. खुलताबाद जि. छत्रपती संभाजीनगर हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप वाघ, पोलीस अंमलदार सुधीर कांबळे, ज्ञानेश्वर राऊत, प्रसन्ना सातदिवे आदींनी अपघातस्थळी धाव घेत विशाल वाघचौरे याचा मृतदेह घाटीत रवाना केला. आणि कंटेनर पोलीस ठाण्यात जमा केला. या अपघाताची नोंद वाळुज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

व्हिजिटिंग कार्डवरून पटली ओळख –
कंटेनर आणि दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार झाल्याची माहिती मिळतात वाळुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन निपचित पडलेला होता. तसेच त्याच्या दुचाकीच्या समोरील भागाचा होता. पोलिसांनी त्याचा खिसा तपासला असता त्यात व्हिजिटिंग कार्ड मिळून आले. आणि त्यावरूनच मयताची ओळख पटली.
