
वाळूजमहानगर, (ता.13) -दुचाकीवर जाताना चक्कर येऊन पडल्याने झालेल्या अपघातात 25 ते 35 वयोगटातील एक महिला व एक पुरुष असे दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ बिडकीन येथे दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी (ता.13) रोजी दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास इसारवाडीफाटा ते बिडकीन हायवेवर गुरु धानोरा येथे झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पैठण तालुक्यातील जांबडी येथील नवनाथ पांडुरंग ढोबळे (वय 35) आणि उज्वला प्रकाश वाकडे (वय 25) व चार ते सहा वयोगटातील दोन लहान मुले असे चार जण गुरुवारी (ता.13) दुपारी 4.15 वाजेच्या सुमारास गंगापूरवरून बिडकिनला जात होते. दुपारी उन्हाचा कडाका वाढल्याने गुरुधानोरा गावाजवळ चक्कर येऊन ते दुचाकीवरून पडले.
या अपघातात नवनाथ ढोबळे व उज्वला वाकडे हे दोन जखमी झाले. मात्र सुदैवाने चार ते सहा वयोगटातील दोन लहान मुले बालंबाल बचावले. या अपघाताची माहिती मिळताच लिंबे जळगाव पॉइंटवर उभी असणार्या जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या विनामूल्य ॲम्बुलन्सने तात्काळ अपघातस्थळी धाव घेत जखमी अपघातग्रस्तांना बिडकीन येथील वरद हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
