
वाळूज महानगर, (ता.24) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे दुकान फोडून विविध कंपनीच्या मोबाईलसह रोख रक्कम मिळून जवळजवळ 73 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना रविवारी (ता.24) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील प्रसाद पोपट खरात याचे भाजी मंडई नेहरुनगर, रांजणगाव कॉर्नर येथे रविंद्र मदन बोराडे यांच्या मालकीच्या गाळ्यात विशाल एंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. शनिवारी (ता.23) रोजी नेहमीप्रमाणे खरात हे दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री दहा ते रविवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान दुकानाचे शटर उचकटून आतील 10 हजार रुपये रोख रक्कम तसेच सॅमसंग, ओप्पो, विवो, एमआय, अँप्पल कंपनीचा आयफोन, ओप्पो निओ सेव्हन कंपनीचा मोबाईल. असा एकुण 73 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. रविवारी (ता.24) रोजी सकाळी गाळा मालकाने दुकानात चोरी झाल्याचेकळविल्या वरून खरात यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता ही चोरीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
