
वाळूजमहानगर, (ता.13) – दुकान बंद करण्यापूर्वी हिशोबाचे पैसे मोजत असताना चोरट्यानी पिस्टोलचा धाक दाखवून व्यापाऱ्याकडील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने चोरट्याने पळ काढला. त्यामुळे मोठी घटना टळली. वाळूज परिसरातल्या पंढरपूर येथे मंगळवारी (ता.11) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा खळबळजनक प्रकार घडला.
याबाबत व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंगळवारी (ता.11) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथील श्री साई ट्रेडर्सचे मालक संतोष मुंदडा हे पंढरपूर येथे दुकानाचे शटर अर्धवट करून दिवसभर झालेल्या व्यवहारातील हिशोबाचे पैसे मोजत होते. त्याचवेळी एका दुचाकीवर आलेल्या तिघापैकी एकाने दुकानात प्रवेश करत मुंदडा यांना पिस्तोलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी पिस्टोल दाखवताच व्यापाऱ्यांनी प्रसंगावधान राखून समोर टेबलवर ठेवलेला लोखंडी राड उगारल्याने चोरट्याने पळ काढला. त्यामुळे बजाजनगर येथील मोठी घटना घडली. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेने व्यापारी वर्गात मोठे दहशतीचे वातावरण पसरले असून संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रसंगावधान राखल्याने टळला अनर्थ –
ज्यावेळी आरोपी दुकानात आला, त्यावेळी व्यापारी रोख रक्कम मोजत असल्याचे पाहताच त्याने व्यापाऱ्याच्या दिशेने पिस्तूल रोखला. मात्र प्रसंगावधान राखून संतोष मुंदडा या धाडसी व्यापाऱ्याने लोखंडी राड उगारत पकडा, पकडा असे म्हणाल्याने पाठीमागे कोणीतरी आहे असे समजून चोरटा पळून गेला. या घटनेत संतोष मुंदडा या व्यापाऱ्याचा जीव तर वाचलाच शिवाय दिवसभराची गल्ल्यातील रोख 70 हजार रुपये रक्कम ही वाचली. या घटने दरम्यान मुंदडा यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.
