
वाळूज महानगर, (वा 24) – पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार असलेला दरोड्यातील आरोपी दिवाळीला घरी आला. त्याची चाहूल लागताच पोलिसांनी सापळा रचला आणि त्यात तो गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी अडकला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज औद्योगिक वसाहतीतील एम सेक्टर जोगेश्वरी येथील अशोक इलेक्ट्रिकल या कंपनीत 15 जुलै रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास दरोडा पडला होता. या दरोड्यात आरोपींनी 7 लाख 97 हजार 600 रुपये किमतीचे कॉपर वायर चोरून नेले होते. या दरोड्यातील आरोपींना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यातील संतोष अशोक कांबळे (वय 29) रा. अजवानगर वाळूज हा पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होता. दिवाळी सणानिमित्त कांबळे हा वाळूज येथे घरी आला. त्याची चाहूल लागताच वाळुज एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचला आणि त्यात तो गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी अलगद अडकला. ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गीते, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे, धीरज काबलिये, सुरेश भिसे, रवींद्र गायकवाड, संदीप तागड, संतोष बमनाथ, दीपक जाधव आदींनी केली.
