वाळूजमहानगर, (ता.20) – वाळूज येथील फतेजा कंपनीतील खुनाचे गुढ उलगडले असून मयताची ओळख पटताच पोलिसांनी पाच वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेऊन दोन जणांना मंगळवारी (ता.17) रोजी जेरबंद केले. दारू पिता पिता वाद झाला आणि आरोपींनी मयत अजय निलवर्ण याला दुचाकीवरून फतेजा कंपनीच्या मोकळ्या जागेत नेले. आणि तेथेच त्याचा खून करून मुंडके धडा वेगळे केले. असे या गुन्ह्यात समोर आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतमधील फतेजा कंपनीच्या मोकळ्या जागेत धडापासून वेगळे केलेले मुंडके असा एका तरुणाचा मृतदेह 15 जानेवारी 2023 रोजी आढळून आला होता. या प्रकरणातील आरोपी व मयत हे दोन्हीही अनोळखी होते. त्यामुळे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे होते. मात्र वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पाच वेगवेगळे पथके तयार करण्यात येऊन प्रथम या प्रकरणातील मयताचा शोध घेण्यात आला. अजय व्यंकटराव नीलवर्ण रा. मंगरूळ (पापड) ता. मानवत जि. परभणी हल्ली मुक्काम रांजणगाव (शेणपुंजी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याचे निष्पन्न झाले. मयताची ओळख पटताच वरिष्ठांनी तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवण्यासाठी मार्गदर्शन केले. आणि तयार करण्यात आलेले पथकं हिंगोली, परभणी, पुणे येथे रवाना झाले. तेव्हा त्यांना समजले की, आरोपी हे कल्याण, ठाणे येथे गेल्याचे व तेथे मसा या ठिकाणी ते काम करीत असल्याची माहिती मिळाली. तेथे जाऊन या पथकाने सापळा रचून आरोपी निखिल भाऊसाहेब गरड वय 19, धंदा हॉटेल मंजुरी रा. जळगाव ता. पैठण जि. औरंगाबाद. हल्ली मुक्काम शिवनेरी कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी) व प्रतीक सत्यवान शिंदे वय 21 धंदा कंपनीत काम रा. हिवरे ता. कोरेगाव जि. सातारा. हल्ली मुक्काम शिवनेरी कॉलनी रांजणगाव या दोघांना ताब्यात घेतले.
असे उलगडले गुढ–
या प्रकरणातील मयत अजय व्यंकटराव निलवर्ण उर्फ देशमुख व आरोपी निखिल गरड, प्रतीक शिंदे हे एकमेकांचे मित्र आहेत. 14 जानेवारी रोजी दुपारी तिघेही उशिरापर्यंत दारू पीत बसले. त्यानंतर त्यांच्यात दारू पिता पिता आपसात वाद झाला. त्यामुळे आरोपींनी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अजय निलवर्ण याला फतेजा कंपनीच्या मोकळ्या जागेत दुचाकीवर बसवून नेले. अजय हा दारूच्या नशेत असल्याने आरोपींनी त्याचा खून करून मुंडके धडा वेगळे केले. तसेच कोणाला ओळखू नये म्हणून त्याचे मुंडके व छाती शर्टाने जाळण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याच्यावर दगड माती व परिसरातील झाडांच्या फांद्या टाकून मृतदेह लपवला होता. त्यानंतर दोन्ही आरोपी एच एफ डीलक्स या दुचाकीवरून नगरच्या दिशेने फरार झाले होते.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज ठाण्याचे निरीक्षक सचिन इंगोले, दुय्यम पोलीस निरीक्षक गणेश ताठे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत, गौतम वावळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, राहुल निर्वळ, सचिन पागोडे, चेतन उगले, राजेंद्र बांगर, अशोक इंगोले, पोलीस नाईक बाबासाहेब काकडे, बाळू लहरे, राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, अविनाश ढगे, हनुमंत डोके, शिवनारायण नागरे, प्रदीप कुटे, सुरेश कचे, सूरज अग्रवाल, लखन घुशिंगे, तसेच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ मांडोळे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, पोलीस अंमलदार राहुल खरात, अमोल शिंदे, नितीन देशमुख, काकासाहेब आधाने, दादासाहेब झारगड यांनी केली.
