
वाळुज महानगर, (ता.27) – उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी वडगाव (को.) येथे आला असता पोलिसांनी त्यास सरेंडर होण्याचे सांगितले. मात्र त्याने पळून जाण्याच्या उद्देशाने पोलिसांवर गोळी झाडून त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर बेछुट गोळीबार करून सोमवारी (ता.26) रोजी रात्री त्याचा एन्काऊंटर केला. पोलिसांची मान खाली घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दरोड्याचा पोलिसांनी सोक्षमोक्ष लावला. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारी कमी होण्याच्या नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या.
याबाबतची अधिक माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील उद्योजक संतोष लड्डा यांचा बजाजनगरात अलिशान बंगला आहे. गेल्या 7 मे रोजी संतोष लड्डा हे अमेरिकेला गेले होते. त्यामुळे बंगल्यामध्ये झळके हे केअरटेकर होते. 15 मे रोजी पहाटेच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश करून केअरटेकर झळके याला बांधून टाकले आणि आतील सोन्या चांदीचा करोडो रुपये किमतीचा ऐवज घेऊन पोबारा केला होता.
या दरोड्यातील आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांनी बराच आटापिटा केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागत नव्हते. त्यामुळे या दरोड्यातील आरोपींनी निश्चितच पोलिसांची मान खाली घालण्याचा प्रयत्न केला. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खचून न जाता मोठ्या धैर्याने सर्वच फौजफाटा कामाला लावला. आणि उद्योजक संतोष लड्डा दरोड्या प्रकरणातील पाच आरोपींना जेरबंद केले.
दरम्यान पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत जेरबंद केलेल्या आरोपींकडून मुख्य आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान सोमवारी (ता.26) रोजी रात्री तो वडगाव को येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी सापळा रचला होता.
दरम्यान रात्री अकरा वाजेच्या सुमारास या दरोड्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा तेथे आला. पोलिसांनी त्याला सरेंडर (आत्मसमर्थन) करण्याचे सांगितले. मात्र त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करत पळून जाण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला प्रतिउत्तर म्हणून तसेच स्वसंरक्षणार्थ आरोपीच्या दिशेने बेछुट गोळीबार केला. यात त्याचा एन्काऊंटर झाला.
