
वाळुज महानगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धा पी पी कॉलेज नेकनूर येथे नुकत्याच झालेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत दगडोजीराव देशमुख महाविद्यालय वाळूजचा संघ हा उपविजेता ठरला.
या स्पर्धेत दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या खेळाडूंनी साखळी आणि उपांत्य फेरीत उत्कृष्ट खेळ करत अनुक्रमे देवगिरी महाविद्यालय, संभाजीनगर, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, सिल्लोड तसेच के. एस. के महाविद्यालय बीड यांचा पराभव करून प्रथमच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले. लोकमान्य टिळक महाविद्यालय, वडवणी यांच्या सोबत झालेल्या अंतिम सामन्यात महाविद्यालयाच्या संघाने द्वितीय स्थान पटकावले. या संघास डॉ. सीमादेवी मुंडे आणि डॉ अनिता पारगावकर यांनी मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या नरेश गांगुले, विनायक गहिरे, कौशिक शेलोटकर, रिझवान शेख ,कार्तिक संभेराव, रेहान पठाण या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला.
पुढील स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड –
महाविद्यालयाच्या अनेक खेळाडूंची पुढील स्पर्धांसाठी देखील निवड झाली आहे. भोपाळ येथे होणाऱ्या अंतर विद्यापीठ वेस्ट झोन स्पर्धेसाठी कार्तिक संभेराव, कौशिक शेलोटकर व रिजवान शेख याची निवड तर नांदेड येथे होत असलेल्या 27 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी कौशिक शेलोटकर, रिजवान शेख, नरेश गांगुले यांची विद्यापीठाच्या व्हॉलीबॉल संघात निवड झाली. तसेच साक्षी राठोड हिची क्रीडा महोत्सव तसेच आंतर विद्यापीठ वेस्ट झोन स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या महिला व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे.
