वाळूजमहानगर – केंद्रीय युवा महोत्सवामध्ये बहुमान बजाजनगरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या संघास यंदाचा उत्कृष्ट ग्रामीण संघाचा बहुमानही मिळाला. या बहुमानामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित युवा महोत्सव 2022 मध्ये एकूण 36 कला प्रकारापैकी बजाजनगरातील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाने 22 कलाप्रकारात 35 विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविले. यात वैष्णवी नरवाडे हिने सादर केलेल्या पारंपारिक लावणी कला प्रकारात द्वितीय पारितोषिक पटकाविले तर विजय पवार, मंगेश सुरडकर, आशिष कसबे, यश भालेराव, साक्षी निकम आणि वैष्णवी ठोकरे यांनी सादर केलेल्या आंबेडकरी जलसेला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव विलास राऊत, संस्थेचे संस्थापक सचिव विजय राऊत व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज धबडगे यांनी स्वागत केले. युवा महोत्सव 2022 मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना संघप्रमुख प्राचार्य डॉ. युवराज धबडगे, प्रा.अनुजा कंदी, अनिल तांबे आणि प्रशांत सरोदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर सहाय्यक संघप्रमुख म्हणून प्रा. नागेश बोंतेवाड, प्रा. विशाल दखणे, प्रा. रजनी इंगळे आणि प्रा. सोनी निशाद यांनी परिश्रम घेतले.