March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.1) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मध्ये बुधवारी (ता.1) फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ट्रान्सपोर्ट, ट्रेडर्स व इंटरप्राईजेस मधील लाखो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला. दरम्यान 200 लिटर फोम व 5000 ते 6000 लिटर लिटर पाण्याचा मारा करून अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. मात्र आग लागल्याचे कारण कळू शकले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर मधील स्वस्तिक ट्रान्सपोर्ट मधील केमिकल ड्रमला प्रथम आग लागल्याचे सांगितले जाते. त्यानंतर ही आग भडकत गेल्याने शेजारीच असलेल्या वल्लभ ट्रेडर्स व पार्थ इंटरप्रायजेसला आग लागली. बुधवारी (ता.1) रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीत ट्रान्सपोर्ट, ड्रेडर्स व इंटरप्राईजेसच्या एकूण पाच शटर मधील माल जळून मोठे नुकसान झाले.

वाळूज अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेऊन आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहे. दरम्यान घटनास्थळी बघ्यांचा मोठा जमाव जमला. शिवाय खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील सर्व दुकाने व लहान मोठ्या कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या. दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे उपअधिकारी पि के चौधरी, के टी सुर्यवंशी, पि के हजारे, एस डी उकरे, अशोक हातवटे, एस बी महाले,वाय डी काळे व एस सी पाटील यांनी 40 लिटरचे पाच कॅन फोम व सुमारे 5 ते 6 हजार लिटर पाण्याचा मारा करून एक तासात ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या पाचही शटर मधील ऐवज जळून खाक झाला होता. मात्र आग लागल्याचे कारण नेमके काय?. याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही.

या आगीच्या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी अग्निशमन केंद्र व वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *