February 5, 2026

वाळुज महानगर, (ता.16) – व्ही.आय.पी. मुव्हमेंट असल्याने शुट, बुट घालून विवाह सोहळ्याच्या ठिकाणी हजर राहून तो आयएएस (IAS) अधिकारी प्रधानमंत्री कार्यालयाचा सेक्रेटरी (PMO Secretary), निती आयोग सदस्य, असल्याचे भासवून तसेच लोकसेवक असल्याचे दर्शविण्यासाठीच्या वस्तू सोबत बाळगून लोकांची फसवणूक करण्याच्या इराद्याने वावरणाऱ्या व निती आयोगाचा सदस्य असल्याबाबत खोटी माहिती देणाऱ्या तसेच त्याला गुन्ह्यात संगणमताने सहाय्य करणाऱ्याला अशा दोघात तोतयागिरी करणाऱ्यांना पोलिसांनी पकडून रविवारी 16 नोव्हेंबर रोजी जेरबंद केले. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील हॉटेल ग्रँड सरोवर तिसगांव येथे रामजी कुलकर्णीच्या मुलीच्या विवाह सोहळयाच्या ठिकाणी व्ही.आय.पी. मुव्हमेंट असल्याने पोलीस आयुक्तांच्या आदेशाने रविवारी 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:30 ते 3 वाजेच्या दरम्यान पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या बंदोबस्ताची देखरेख पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त भागिरथी पवार या करीत होत्या, बंदोबस्ताच्या ठिकाणी वाळूज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस रामेश्वर गाडे, वाळुज पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवचरण पांढरे, सपोनि. संजय गित्ते, पोउपनि. सागर पाटील, तसेच विशेष शाखेचे अंमलदार, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार साध्या गणवेशात होते. तसेच इतर बंदोबस्त गणवेशामध्ये होता.


विवाह मंडपातील स्टेजवरील व्यक्तीने माईक मध्ये अशोक भारत ठोंबरे (PMO Secretary) असे नाव स्वागतासाठी पुकारले. तेव्हा बंदोबस्ताच्या ठिकाणी हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी ते ऐकले. मात्र या कार्यक्रमासाठी प्रधानमंत्री कार्यालयाचे कोणीही वरिष्ठ अधिकारी येणार असल्याची कोणतीही सुचना पोलीस ठाणे अथवा पोलीस आयुक्त कार्यालयास प्राप्त नसल्याने अशोक ठोंबरे याच्याबाबत पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे व वरिष्ठांना शंका आल्याने त्याच्या पदाबाबत व नेमणुकीच्या ठिकाणाबाबत विचारपूस केली असता त्याने तो निती आयोगाचा सदस्य असल्याचे सांगीतले. त्याबाबत बारकाईने विचारपूस करता तो गोंधळून उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. शिवाय त्याच्याकडे प्रधानमंत्री कार्यालयाचा अधिकारी असल्याचे कोणतेही ओळख, पुरावा मिळून आला नाही. त्यानंतर त्याच्या सोबत आलेल्या इतराबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्या सोबत त्याचा बॉडीगार्ड विकास प्रकाश पांडागळे हा आलेला असल्याचे व

तो कार्यक्रमासाठी इनोव्हा कार (एम एच 12, एस एल – 9892) चा चालक विजय चिमाजी बोरले (वय 49 वर्ष), रा. निवृत्तीनगर चरवड वस्ती लेन नं. बी-5, फ्लॅट नं. 401, वरद विनायक सोसायटी पुणे – 41, याच्यासह आला असल्याचे सांगीतले. त्यावरून त्याच्या इनोव्हा कारची झडती घेतली असता एका सुटकेसमध्ये पांढऱ्या रंगाच्या पाटीवर लाल रंगाच्या अक्षरात मराठी मध्ये भारत सरकार असे लिहलेले होते. दुसऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या पाटीवर GOVT. OF INDIA असे दोन्ही बाजूने इंग्रजी मध्ये लाल रंगामध्ये लिहलेले होते. शिवाय वाहनाच्या समोर लावण्यासाठी पिवळ्यात धातूची कडी असलेला तिरंगा ध्वज, एक चॉकलेटी रंगाची सुटकेस अशा वर्णनाच्या लोकसेवक म्हणून बतावनी करण्यासाठी स्वतः जवळ बाळगलेल्या वस्तू मिळून आल्या. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम यांच्या फिर्यादीवरून आरोपी अशोक भारत ठोंबरे (वय 45 वर्ष), रा. केंड फ्लोर 2/35, सदर बाझार डेली कँन्टोलमेंट साऊथ वेस्ट दिल्ली 110010, (ह.मु. उंदरी ता. केज जि. बीड). व त्याच्यासोबत असलेला विकास प्रकाश पांडागळे, रा. भिमनगर मनीषपार्क शेजारी कोंडवा खुर्द पुणे या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम 319(2), 204, 205, 212 (अ), 3 ( 5 ) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. नरेश ठाकरे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *