वाळूजमहानगर – दोन दुचाकी एका मागे एक जात असताना समोरून रॉंग साईडने एक मोटर सायकल ट्रिपल सीट आल्याने झालेल्या विचित्र अपघातात एक जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाले हा अपघात सोमवारी (ता.3) रोजी रात्री 8.50 वाजेच्या सुमारास मोरे चौकात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील तिसगाव येथील शांतीलाल नारायण सलामपुरे वय 27 व सत्यवान रणनवरे वय 20 असे दोघे दुचाकी (एम एच 20-2744) वरून मोरे चौकातून जात होते. त्यांच्या बाजूने आणखी एक दुचाकी येत होती. त्याचवेळी समोरून रॉंग साईडने एक दुचाकी आली. त्यावर तीन जण होते.असे सांगण्यात येते. या तिन्ही दुचाकी एकमेकीला धडकल्या. सोमवारी (ता.3) रोजी रात्री 8.50 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिसगाव येथील शांतीलाल नारायण सलामपुरे हे गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध झाले. त्यांच्यासोबत असलेला सत्यवान रणनवरे हा मात्र या अपघातातून बालंबाल बचावला. तर दुसऱ्या दुचाकी वरील एकाचा डोळा निकामी झाला असून त्याचा साथीदारही जखमी आहे. त्यांच्यावर बजाजनगर येथे उपचार सुरू आहे. मात्र त्यांची नावे समजू शकली नाही. जखमींना मनोज जैन व भरतसिंग सलामपुरे यांनी उपचारार्थ प्रथम बजाजनगर व नंतर घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून शांतीलाल सलामपुरे यांना मयत घोषित केले.