
वाळूजमहानगर, (ता.21) – पोलिसांची गुन्हेगारांवरची कमान सैल झाल्याने वाळूज औद्योगिक वसाहतीतील चोऱ्यामाऱ्यासह मोबाईल चोरट्यांची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसात मोबाईल चोरीने थैमान घातले असून आणखी तीन जणांचे जवळजवळ 45 हजार रुपये किमतीचे मोबाईल लंपास करण्यात आले आहे.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील कामगार भागवत नाना पाटील हे वडगाव कोल्हाटी गट नंबर येथे राहतात. मंगळवारी (ता.19) रात्री 11.30 वाजेच्या सुमारास नेहमी प्रमाणे ड्युुटीला जाण्यासाठी नायरा पेट्रोल पंपाजवळ उभे होते. बस येण्यासाठी वेळ झाल्याने त्यांनी फोन लावण्याकरीता खिशातून मोबाईल काढला. त्यावेळी विना क्रमाक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भागवत याचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला. दुसऱ्या घटनेत श्रीकृष्ण नारायण सुर्यंवशी रा. बंजारा कॉलनी हा मंगळवारी (ता.19) रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मित्राला भेटून मोबाईलवर बोलत पायी घरी जात होता. तो जागृत हनुमान मंदिराजवळ येताच पाठीमागुन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी 16 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. तर तिसऱ्या घटनेत भगतसिंगनगर, मोरे चौक, बजाजनगर येथील बंडु जयराम राऊत हे बुधवारी (ता.20) रोजी बजाजनगरातील जलशुध्दी केद्रांत कामसाठी गेले होते. 10 वाजेच्या सुमारास काम आटपुन केंद्रातुन बाहेर आले. त्यावेळी अज्ञात इसमाने लोखंडी हातोडीचा धाक धाकवून झटापट करून 14 हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेला. याप्रकरणी वाळूज एमाडिसी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल चोरांनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईल चोरट्यांचा फंडा –
मोबाईलवर बोलण्याच्या नादात आहे, एकटाच दिसतोय, आजूबाजूलाही कोणी नाही. असा हेरगिरीचा फंडा वापरत मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या पाठीमागून दुचाकीवर येऊन मोबाईल हिस्कावले जात आहे. कामगारांचे मोबाईल हिस्कावणाऱ्यांनी वाळूज औद्योगिक वसाहतीतील चांगलीच दहशत निर्माण केली आहे. परिणामी कामगार मात्र आर्थिक संकटात सापडत आहे.
पोलिसांची कमान सैल –
वाळूज औद्योगिक वसाहतीत वाढत्या गुन्हेगारीवर मध्यंतरी पोलिसांनी चांगलाच अंकुश ठेवला होता. त्यामुळे येथील गुन्ह्याच्या प्रमाणात अंशतः कमी आली होती. मात्र गुन्हेगारांवरील पोलिसांची कमान सैल झाल्याने वाळुज औद्योगिक वसाहतीतील गुन्हेगारी हळूहळू डोके वर काढत आहे. त्यात मोबाईल हिसकावणाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे.
