वाळूजमहानगर (ता.26) :- दुचाकीवर जाणार्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्या खिशातील 20 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी बळजबरीने काढून घेऊन पळ काढला. शुक्रवारी (ता.21) रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास वाळूज येथे झालेल्या या वाटमारी प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
इंद्रा मार्केट, एन. 7 सिडको, औरंगाबाद येथील गणेश नंदू घोडके वय 26 हा शुक्रवारी (ता.21) रोजी दुपारी 3.45 वाजेच्या सुमारास वाळुज येथील पार्किंग गेट येथे मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवर जात होता. त्याला फोन आल्याने तो दुचाकी थांबून फोनवर बोलत असताना समोरून तीन जण एका दुचाकीवर आले. ते पारधी भाषेत बोलत होते. त्यांनी गणेश घोडके यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यामुळे तो डोळे चोळत असताना त्याच्या खिशातील 20 हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन आरोपीने पळ काढला. भर दुपारी झालेल्या या वाटमारी प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात तीन अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
